माझा प्रभाग, माझी जबाबदारी - संजय गायकवाड
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर
इंट्रो ः सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा असणारे दिघी गावातील गायकवाड कुटुंबियांतील शिवाई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिवाजी गायकवाड म्हणजे कोणत्याही पदाची अथवा प्रसिद्धीची अपेक्षा न करता गावाची उन्नती आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी सतत अग्रेसर असणारे सच्चे सामाजिक कार्यकर्ते होय. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी स्वतःची जागा देण्याबरोबरच गावाचा एकोपा टिकविण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी पुढे असतात. अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी धावून जाणारे संजय गायकवाड नागरिकांना कुटुंबातीलच एक सदस्य वाटतात.
-------------------------
सामाजिक कार्य करत असताना त्याला राजकीय पाठबळ असेल, तर हे काम अधिक जोमाने आणि नेटाने करता येते. संजय गायकवाड यांनी १९८६ पासून शिवसेनेच्या माध्यमातून दिघी गावातील नागरी समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. १९८९ मध्ये संजय गायकवाड यांचे चुलते दत्तात्रेय गायकवाड यांची दिघी गावचे सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे १९९५ मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली. त्यामुळे गायकवाड कुटुंबियांच्या सामाजिक कार्याला नागरिकांद्वारे कामाचीच पावती मिळाली. संजय गायकवाड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून १९८९ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत बाजीराव लांडे यांच्यासाठी काम केले. तर १९९५ मध्ये झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत गजानन बाबर यांच्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळत त्यांच्या आमदारकीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. २००२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत चुलते दत्तात्रेय गायकवाड, किसन तापकीर आणि सुरेखा माटे यांच्या प्रचाराची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत त्यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मात्र, असे असतानाही शिवसेनेच्या कोणत्याही पदाची त्यांनी कधीही अपेक्षा केली नाही. शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक म्हणूनच कार्य करत राहिले. त्यांच्यामध्ये शहराचे नेतृत्व करण्याची क्षमता असतानाही त्यांनी साधा कार्यकर्ता म्हणूनच काम करत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. पक्षासाठी त्यांचे मोलाचे कार्य असतानाही पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी महापालिकेची २०१२ ची निवडणूक अपक्ष लढविली. अगदी अल्प मताने त्यांना विजयाने हुलकावणी दिली. मात्र, तरीही त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्यात कधीही खंड पडू दिला नाही. २०१४ मध्ये तत्कालीन अपक्ष उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारातील दिघी परिसरातील धुरा सांभाळत त्यांना दिघीतून पाच हजार पाचशे मतांची विजयी आघाडी मिळवून दिली. आमदार महेश लांडगे यांना दिघीतून मिळालेली मते दिघीत झालेल्या एकूण मतांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक होती. २०१९ मध्येही भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यासाठी काम करत त्यांना दिघीतून विजयी मते मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी संजय गायकवाड यांनी लिलया पार पाडून भाजपचे चारही उमेदवार निवडून आणले. देशाच्या माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यातील उमेदवार निवडून देण्यासाठीही त्यांनी दिवंगत नगरसेवक लक्ष्मण उंडे यांना निवडणुकीत आर्थिक मदतीचा हात दिला. मात्र, असे असतानाही त्यांनी भाजपकडूनही कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही. कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी पक्षाला पाठबळ दिले.
एकत्रित कुटुंब
गायकवाड यांचे एकत्रित कुटुंब आहे. गाव हे देखील एकत्रित कुटुंबच व्हावे त्याचप्रमाणे दिघी गावातील नागरिकांमध्ये एकोपा राहावा यासाठी संजय गायकवाड यांनी १९८९ मध्ये दिघी गावामध्ये एक गाव एक गणपती, एक गाव एक शिवजयंती, एक गाव एक नवरात्र आदी उपक्रम राबविले. संजय गायकवाड यांनी १९९७ मध्ये शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेची उभारणी चुलते दत्तात्रेय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्यादृष्टीने त्यांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य दिले. त्याचप्रमाणे नागरिकांच्या विविध आर्थिक गरजांसाठीही अल्पदराने कर्ज पतसंस्थेच्या माध्यमातून देण्यात आले.
रस्त्याचा प्रश्न सुटला
दिघी - भोसरीला जोडणाऱ्या रस्त्याचे काम २० वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे नागरिकांना भोसरीत येण्यासाठी दोन-तीन किलोमीटरचा वळसा मारून मॅगझीन चौकावरून आळंदी रस्तामार्गे भोसरीत यावे लागत होते. संजय गायकवाड यांनी या रस्त्याच्या विकसनासाठी आणि डांबरीकरणासाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला. शेवटी या रस्त्याच्या विकसनाबरोबरच या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने दिघीकरांचा रस्त्याचा प्रश्न सुटला. भारत मातानगर ते गायरानातून दिघीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी देखील त्यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
धार्मिक कार्यात सहभाग
दिघीतील मारुती-भैरवनाथ मंदिरांच्या जिर्णोद्धाराची जबाबदारी गायकवाड यांनी २०१० मध्ये पार पाडली. गजानन महाराज मंदिराच्या उभारणीचाही आर्थिक भार संजय गायकवाड यांनी उचलला. बी. यू. भंडारी सोसायटी क्रमांक ६७ मधील गणपती मंदिरासह भारतमातानगरमधीलही गणपती मंदिराच्या उभारणीत गायकवाड यांनी योगदान दिले. दिघी गावातील गुरुद्वारा उभारण्यासाठी संजय गायकवाड यांनी चार गुंठे जागा दिली. त्याचप्रमाणे दत्तगडावर दत्त मंदिर बांधून गेल्या २२ वर्षांपासून मंदिराची सेवा व देखभाल करण्याची जबाबदारी संजय गायकवाड पार पाडत आहेत. पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी व वारकऱ्यांच्या स्वागताबरोबरच वारकऱ्यांनाही मदत करण्याचे काम संजय गायकवाड गेल्या २५ वर्षांपासून करत आहेत.
कोरोना रुग्णांसाठी पुढाकार
लॉकडाउन काळामध्ये सलग दोन महिने दररोज सुमारे चार हजार नागरिकांना मोफत अन्नदान त्यांनी केले. त्याचप्रमाणे दीड हजार नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. संजय गायकवाड यांच्या माध्यमातून दिघीतील मातृछाया बालकाश्रम व ज्ञानदीप बालकाश्रम यांना नेहमीच मदतीचा हात लाभला आहे. पिंपरी चिंचवडमधील महापालिकेशिवाय संजय गायकवाड यांच्या माध्यमातून उभारलेले कोविड केअर सेंटर हे एकमेव होते. या सेंटरमधून सुमारे दोन हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी उपचार घेतला.
वारीची परंपरा
गायकवाड कुटुंबीयांमध्ये वारीची परंपरा वडिलोपार्जित आहे. दरवर्षीच्या आषाढी-कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना अन्नदानासह त्यांचा सत्कार करण्याची परंपरा गायकवाड कुटुंबीयांनी आजतागायत जपली आहे. दिघी गावांमधील पालखी, जत्रा, दसरा, कालाष्टमीला निघणाऱ्या पालखीचा मान आजही गायकवाड कुटुंबीयांना दिला जातो. संजय गायकवाड यांनी गायकवाड कुटुंबीयांची आध्यात्मिक, सामाजिक, सांप्रदायिक परंपरा आपल्या कार्य आणि समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून जिवंत ठेवली
आहे.
विविध समस्यांचा पाठपुरावा
दिघी गाव हे पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्यावर रस्ते, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची कमतरता, सांडपाणी वाहिन्या आदी समस्या होत्या. संजय गायकवाड यांनी रस्त्याचे विकसन आणि डांबरीकरणासाठी पाठपुरावा केला. पुणे-आळंदी रस्त्यासाठी गायकवाड कुटुंबीयांनी जागाही दिली. त्याचप्रमाणे दिव्यांची सोय होण्यासाठी रस्त्याच्याकडेला पथदिव्यांसाठीही पाठपुरावा केला. सांडपाणी वाहिन्यांसाठी वेळोवेळी त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. दिघीमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी एक एकर जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी दिली. त्याचप्रमाणे पंपिंग स्टेशनसाठीही चार गुंठे जागा दिली. त्यामुळे दिघीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.