पुणे, ता. ५ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स बास्केटबॉल स्पर्धेत कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूलने १६ वर्षांखालील मुले आणि मुली अशा दोन्ही गटांमध्ये शुक्रवारी (ता.५) बाजी मारत दुहेरी विजेतेपद पटकाविले. इंदिरा नॅशनल स्कूलने मुलांमध्ये तर घोरपडी येथील क्लॅरा ग्लोबल स्कूलने मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले.
डेक्कन जिमखाना येथील बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा पार पडली. प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय महिला बास्केटबॉलपटू रेवा कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक मॅथ्यू फर्नांडीस आणि वरिष्ठ बास्केटबॉल पंच अरविंद प्रभाकर घाटे यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या व तृतीय स्थानांवरील संघांना पदके देऊन गौरविण्यात आले.
मुलांच्या गटातील अंतिम सामना अटीतटीचा झाला. मिलेनियम नॅशनलने इंदिरा नॅशनल स्कूलचा ५६-४६ असा अवघ्या दहा गुणांनी पराभव केला. अजय बारवटकर याने सर्वाधिक २४ व सोहम थोरात याने १३ गुण नोंदवून संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले. उपविजेत्या इंदिरा नॅशनलकडून अभिनव करमाळकर याने १८ गुणांची नोंद करून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. न्यू नऱ्हे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलने शिवणे येथील वॉलनट स्कूलवर ३२-२५ असा सात गुणांनी निसटता विजय मिळवून ब्राँझपदक जिंकले.
मुलींच्या गटातील अंतिम सामना एकतर्फीच झाला. त्यामध्ये मिलेनियम नॅशनल स्कूलने क्लॅरा ग्लोबल स्कूलचे आव्हान ३१-३ असे सहज मोडीत काढले. अराना सिनकर हिने आठ तर हर्षा पवार हिने सहा गुणांची नोंद करून संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत प्रभात रस्ता येथील सिंबायोसिस स्कूलने इन्फेंट जीसस स्कूलचा ३२-२५ असा पराभव करून ब्राँझपदकाची कमाई केली.