पुणे, ता.१० ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स कबड्डी स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील मुलांच्या गटात फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलने चुरशीच्या अंतिम सामन्यात जेतेपदाला गवसणी घातली. भिलारेवाडीचा आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या संघाने उपविजेते तर कात्रजच्या सरहद स्कूलने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
नेहरु स्टेडियम येथील पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेचा अंतिम सामना नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल आणि आयर्न्स वर्ल्ड स्कूलमध्ये झाला. ‘आर्यन्स वर्ल्ड’ चढाई करण्याचा निर्णय घेतला. ‘आर्यन्स वर्ल्ड’ने पहिल्या डावात चांगला खेळ केला. लोनचे २ गुण, बोनसचे ६ असे एकूण २८ गुण वसूल केले.
तर नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या खेळाडूंनीही लोण चढवून २ गुण आणि बोनसचे ४ अशी एकूण २५ गुणांची कमाई केली. त्यामुळे मध्यंतराला दोन्ही संघांचा २५-२८ असा गुणफलक राहिला. परंतु, दुसऱ्या डावात नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलने अधिक आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडविले. बोनसचे ७ आणि लोनचे ४ असे एकूण ३४ गुण प्राप्त केला. याउलट ‘आयर्न्स वर्ल्ड’ संघाला तांत्रिक, अव्वल पकडचे प्रत्येकी एकेक, लोनचे २ आणि बोनसचे ९ असे एकूण २६ गुण मिळविता आले. सामन्याच्या अखेरीस नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलने ५९-५४ असे अवघ्या ५ गुणांनी विजेतेपद पटकाविले.
तृतीय क्रमाकांच्या सामन्यात कात्रजच्या सरहद स्कूलने सह्याद्री नॅशनल स्कूलवर २९-१४ असा १५ गुणांनी विजय मिळविला. विजयी संघाने पहिल्या डावापासून वर्चस्व राखले. लोन आणि बोनसच्या प्रत्येकी २ गुणांसह एकूण १६ गुण प्राप्त केले. तर सह्याद्री नॅशनल स्कूलला केवळ ७ गुणांचीच कमाई करता आली. त्यामध्ये प्रत्येकी एकेक तांत्रिक आणि बोनस गुणांचा समावेश होता. दुसऱ्या डावातही संघाला चमकदार कामगिरी करता आली नाही. संघाला ३ बोनस गुणांसह ७ गुणच मिळवता आले. तर सरहद स्कूल संघाने १ बोनस, २ लोन असे एकूण १३ गुण प्राप्त केले. अखेरीस सरहद स्कूलने २९-१४ असा १५ गुणांनी सामना जिंकला. सुवर्णपदक विजेत्या संघाला प्रशिक्षक अखिलेश तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. रौप्यपदक विजेत्या ‘आर्यन्स वर्ल्ड’ संघाला प्रमोद पायगुडे तर ब्राँझपदक विजेत्या सरहद स्कूल संघाला विनायक बिर्जे यांनी मार्गदर्शन केले.