प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ : पुणे जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा फटका १२८ ‘आरोग्य सेवक ५० टक्के पुरुष’ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना बसत आहे. विद्यार्थ्यांची मार्च २०२५ मध्ये दस्तऐवज पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, चार महिने उलटूनही त्यांना नियुक्ती पत्र मिळाले नाही. पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने उमेदवारांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कोणत्या मुहूर्तावर जिल्हा परिषद नियुक्ती पत्र देणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी २०२३ मध्ये विविध एक हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये परीक्षा देखील झाली. तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मार्च २०२५ मध्ये या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली. या सर्व प्रक्रियेमध्ये साधारण दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला. मात्र अद्याप एकाही ‘आरोग्य सेवक ५० टक्के पुरुष’ विद्यार्थ्याला नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. विशेष बाब म्हणजे इतर संवर्गातील विद्यार्थ्यांचे नियुक्तीपत्र भेटून ते सेवेत रुजू देखील झाले. मग ‘आरोग्य सेवक ५० टक्के पुरुष’ संवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘‘आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून, अनेक परीक्षा देऊन आमची निवड झाली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून नियुक्ती पत्राची प्रतिक्षा करावी लागत आहे. या संदर्भात परीक्षार्थींनी पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांना निवेदन देखील दिले आहे. मात्र, आम्हाला केवळ आश्वासनेच मिळत आहेत. निवड होऊनही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र मिळाले नाही.
मी गेल्या चार महिन्यांपासून या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. ही नोकरी मिळाली असती तर कुटुंबाला हातभार लागला असता. आतापर्यंत माझी किती पगाराची रक्कम बुडाली असेल याचा विचारही करवत नाहीये. सरकारची आणि जिल्हा परिषद प्रशासनाची ही अनास्था आमच्या भविष्याशी खेळतेय.
- एक विद्यार्थी
दिवसरात्र अभ्यास करून, स्वतःला झोकून देऊन आम्ही ही परीक्षा पास केली. कागदपत्र पडताळणी देखील झाली. मात्र, अजूनही नियुक्ती नाही. इतर संवर्गातील माझ्या मित्रांना नोकऱ्या मिळाल्या आणि ते कामावर रुजूही झाले. पण आम्ही अजूनही वाटच पाहतोय. आमच्या पालकांना काय उत्तर द्यायचे हेच कळत नाहीये.
- एक विद्यार्थी
आरोग्य सेवक ५० टक्के पुरुष संवर्गासाठी नियुक्तीपत्र देण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.
- श्रीकांत खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.