पिंपरी, ता. २३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेअंतर्गत पुणे विभागातील १४ आगारांमधून दोन हजार ६३३ प्रवाशांनी प्रवास केला. यातून महामंडळाला ४५ लाख ८५ हजार ४२१ रुपये उत्पन्न मिळाले. स्वस्त आणि प्रामुख्याने सुरक्षित प्रवासामुळे या योजनेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे.
नागरिकांनी कमी खर्चात विविध पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे फिरावे व नागरिकांना एसटीच्या प्रवासाकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत चार किंवा सात दिवस असे पासचे पर्याय असतात. याचा लाभ घेत १४ आगारांमधून एक जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान दोन हजार ५५८ प्रवाशांनी चार दिवसांचा, तर ७५ प्रवाशांनी सात दिवसांचा पास घेतला आहे.
अशी आहे योजना
एसटी महामंडळाकडून १९८८ पासून ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना राबविली जात आहे. या पासची वैधता पहिल्या दिवशी रात्रीचे १२ वाजल्यापासून ते शेवटच्या दिवशी (४ आणि ७) दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत असते.
शिवाजीनगर आगार अव्वल
पुणे विभागातील शिवाजीनगर आगारातून सर्वाधिक ९४२ प्रवाशांनी पास खरेदी केले आहेत. त्यानंतर स्वारगेट-८२२ आणि पिंपरी चिंचवड आगारातून ३५६ प्रवाशांनी पास घेतले आहेत. बारामती आगारातून एकाही प्रवाशाने पास खरेदी केला नाही. त्यानंतर भोर-तीन आणि दौंड आगारातून ७ प्रवाशांनी पास खरेदी केले आहेत.
तिकीट दर किती?
बसचा प्रकार - चार दिवस - सात दिवस
प्रौढ - मुले - प्रौढ - मुले
१. साधी, जलद, रात्रसेवा, आंतरराज्य शहरी व मिडीबस - १,८१४ - ९१० - ३,१७१ - १,५८८
२. शिवशाही (आसनी) आंतराज्यासह - २,५३३ - १,२६९ - ४,४२९ - २,२१७
३. ई-बस (ई-शिवाई) - २,८६१ - १,४३३ - ५,००३ - २,५०४
खासगी बसच्या तुलनेत एसटीचे भाडे अत्यल्प आहेत. त्यातही प्रवाशांना चार आणि सात दिवसांचे पास उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रवाशांचा प्रवास परवडतो. सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी जास्तीत जास्त प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.