पुणे, ता. २७ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्यासाठी आखलेले सूक्ष्म नियोजन दिसून येत आहे. अर्ज माघारीपर्यंत विविध रणनीतींचा अवलंब करत भाजपने काही ठिकाणी उमेदवार माघारी घेण्याची खेळी खेळली आहे. राष्ट्रवादीकडून जुन्या निवडून आलेल्या काही सदस्यांची तिकिटे कापत नव्या चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे. शिवसेनेनेही जुन्नर, आंबेगाव आणि खेडमध्ये ताकद वाढवत जिल्ह्यातील लढतीला चांगलीच धार दिली असून, चित्र स्पष्ट होताच प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे.
निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २७) अर्ज माघारीचा दिवस होता. जुन्नरसह इतर तालुक्यांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अर्ज माघारीवरून गोंधळ सुरू होता. अर्ज माघारीनंतर आता थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभांमधून भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या ग्रामीण भागात अजित पवार यांच्यापुढे कडवे आव्हान उभे करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी इतर पक्षातील उमेदवार हे निवडून येण्याच्या निकषावर घेतले आहेत. अशाचप्रकार पक्षप्रवेश राष्ट्रवादीसह शिवसेनेमध्येही झाले आहेत. भाजपचे हे आव्हान मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेत एकाच चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु, आंबेगाव तालुका या निर्णयाला अपवाद ठरला. आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत दोन्ही शिवसेना अशी एकत्रित निवडणूक लढवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भोर तालुक्यात बंडखोरी बघण्यास मिळाली आहे. माजी सदस्यांची तिकीट कापल्याने बंडखोरी केली आहे. तर त्याचठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. राजगड तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. पुरंदर आणि भोरच्या माजी आमदारांना भाजपने सामावून घेतल्यानंतर ही दुसरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांकडून अपेक्षित यश मिळाले नव्हते. आता दोघांची ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भोरमध्ये स्थानिक भाजपच्या नेत्यांचे आव्हाने असेल. दौंड तालुक्यातही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत असून, स्थानिक भाजप आमदारांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. कारण दौंड तालुक्याच्या रूपाने भाजपला ग्रामीण भागात एकमेव आमदार मिळाले आहेत. शिरूर तालुक्यात माजी आमदारांच्या घरात राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने बंडखोरी झाली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असल्याने शिरूरमधील काही इच्छुकांनी शिवसेनेसह इतर पक्षांचा पर्याय निवडला आहे.
इंदापुरात पुन्हा चुरस
इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक अतिशय चर्चेची ठरली होती. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूकही गाजत आहे. जिल्हा परिषदेच्या २०१७ मधील पदाधिकाऱ्यांपैकी असलेल्या प्रवीण माने यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर तिकीट नाकारल्याने अभिजित तांबिले यांनी भाजपला जाहीर पाठिंबा जाहीर केला. तर नगरपरिषदेच्या निवडणुकीवरून झालेल्या नाराजीनाट्यामुळे बाहेर पडलेल्या प्रदीप गारटकर यांनी आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. परिणामी दोन्ही राष्ट्रवादीच्या आजी-माजी मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह इतरांपुढे भाजपने आव्हान उभे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.