पुणे, ता. १ : भोर आणि राजगड तालुक्यातील पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या मतदारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर मेळावा रविवारी (ता. १) पुण्यातील आरोह गार्डन येथे झाला. यावेळी दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणून स्व. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे,’ असा निर्धार उपस्थित कार्यकर्ते व मतदारांनी व्यक्त केला.
या मेळाव्यास आमदार शंकर मांडेकर, भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, जिल्हा परिषदेचे उमेदवार रणजित शिवतरे, अमोल नलावडे, प्रवीण जगदाळे, तानाजी मांगडे यांच्यासह भोर- राजगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे पंचायत समिती उमेदवार सुवर्णा किरण राऊत, सिताताई नंदू खुळे, संदीप खुटवड, अंकुश दसवडकर, राजेश बोडके, सुनिता वरे, सारिका कोंढाळकर, मनीषा कंक यांसह भोर- राजगड तालुक्यातील आजी- माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते व नागरिक संख्येने उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित जनसमुदाय दादांच्या आठवणींनी भावूक झाला. त्यांच्या दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख राजकारणाचा यावेळी उल्लेख करण्यात आला. अजितदादांचे विचार आणि कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या हयातीत नेमून दिलेल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून सभागृहात पाठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी विकासकामांचा ठोस लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, ‘‘कोदवडी पुलाच्या दुर्घटनाग्रस्त घटनेची माहिती दादांच्या कानावर घालताच लगेच साडेसहा कोटी रुपये मंजूर करण्याचे आदेश दिले.’’ ही आठवण सांगताना ते भावुक झाले. दादांचे राजगडसारख्या लहान तालुक्याला विकासापासून वंचित न ठेवता कसे अधिक निधी देऊन सुजलाम् सुफलाम् करता येईल, याचे व्हिजन यावेळेस नमूद केले. तसेच, ते म्हणाले, ‘‘अफवांवर विश्वास ठेवू नका. संभ्रम पसरवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. चुकीच्या कामांना संरक्षण दिले जाणार नाही, गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.