पिंपरी, ता. १९ : कोणताही प्रस्ताव अथवा उपसूचनेला महापालिका स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असते. तरीही, त्यांना डावलून ‘बोगस’ उपसूचनांद्वारे ५२ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याची तक्रार स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आयुक्तांकडे केली आहे. मात्र, बहुतांश उपसूचना महापौर रवी लांडगे यांना उद्देशून आहेत. हा या दोघांच्याही अधिकारांवर घाला आहे. तरीही महापौरांनी कठोर भूमिका घेतली नाही. तसेच आयुक्त किंवा पोलिसांकडे तक्रार केली नाही. यामुळे या प्रकरणात त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यांनी समाज माध्यमांपलिकडे जाऊन काम करण्याची आणि निर्णय क्षमतेवर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
‘बोगस’ उपसूचनांवर सूचक आणि अनुमोदक म्हणून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यातील काहींनी स्वाक्षऱ्या केल्याचे मान्य केले, तर काहींनी ‘आम्ही स्वाक्षऱ्या केल्या नसल्याचे’ स्पष्ट केले. राष्ट्रवादी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या दोन ‘बोगस’ उपसूचना १४ कोटी ७० लाखांच्या आहेत. ही रक्कम मिळून कथित अपहाराची रक्कम ५२ ऐवजी ६६ कोटींवर जाते. यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली असून, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. समितीचा अहवाल सोमवारी (ता. २०) मिळणे अपेक्षित आहे.
महापौरांच्या नावे सर्वाधिक उपसूचना
विविध कामांच्या निधीमध्ये वाढ-घट करण्याच्या सर्वाधिक ‘बोगस’ उपसूचना महापौरांना उद्देशून आहेत. त्यावर आठ दिवसांनी म्हणजे बुधवारी (ता.१५) घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ‘‘कामाच्या व्यापामुळे बोललो नव्हतो. पण, त्या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. या प्रकारास सर्वस्वी मुख्य लेखा व वित्त अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल,’’ असे सांगितले. परंतु, आपल्याला उद्देशून दिलेल्या ‘बोगस’ उपसूचनांवर सदस्यांच्या सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या करून ठेकेदारांना परस्पर बिलांची रक्कम देणे, स्थायी समिती सभापतींसह महापौरांच्या अधिकारांवर घाला आहे. या मागे कोणाचा राजकीय हात आहे? याचीही चौकशी व्हायला हवी.
महापौरांना उद्देशून काही उपसूचना आणि रक्कम (कोटी रुपयांत)
१) छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर स्थापत्य कामे व मोशीतील रस्ते : ११.३२
२) सीएनजी पंप ते मोशी उपबाजार रस्ता व ड क्षेत्रीय कार्यालय प्रशासन : २.००
३) चिखली शिवरस्ता आणि डेटा, कम्युनिकेशन व पाणीपुरवठा : ६.५०
४) पिंपळे गुरव पाणीपुरवठा व ह क्षेत्रीय कार्यालय आणि निगडी जलशुद्धीकरण केंद्र : १.५५
५) निगडी ते दापोडी रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाइन आणि पाणीपुरवठा देयके : ६.५०
६) पुणे ग्रॅंड टूर अंतर्गत रस्त्याची कामे आणि यूटीएफ निधी : ४.२०
७) देहू-आळंदी रस्ता डांबरीकरण व ग्रॅंड टूर दुसरा टप्पा आणि यूटीएफ निधी : १०.५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.