सत्ता इतरांना दिल्यास विकासाचे वाटोळे
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची टीका ः निधी कमी पडू देणार नाही
पिंपरी, ता. ३ ः ‘‘राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना निधीअभावी पायाभूत विकास प्रकल्प ठप्प पडले होते. निधीच नसल्याने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प रखडले. आता केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असून, पिंपरी चिंचवडला निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुढील पाच वर्षे महापालिकेची सत्ता इतर पक्षांच्या हाती देणे म्हणजे विकासाचे वाटोळे करून घेण्यासारखे आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पाचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे आदी उपस्थित होते. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक, विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. बिनविरोध विजयी उमेदवार रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘तरी मी फडणवीस यांना सांगत होतो...’
चव्हाण म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात संविधानाच्या मुद्यावर खोटी प्रतिमा निर्मिती (नरेटिव्ह) पसरविण्यात आली होती, आताही तोच प्रकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी कोणता शर्ट घालायचा, माध्यमांसमोर नेमके काय बोलायचे, याचे सल्ले देणाऱ्या एजन्सी बाजारात सक्रिय आहेत. एजन्सींच्या सांगण्यानुसार हजारो लोकांना कंपन्यांमध्ये बसवून ट्रोलिंगसाठी पैसे दिले जात आहेत. ही सर्व मंडळी कोणत्या पद्धतीने आपल्यासोबत जोडली गेली, याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी खासगीत सावध राहण्याचा आणि विचार करण्याचा सल्ला देत होतो. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही याबाबत थोडा विचार करा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तरीही आज कोण कोणाच्या जिवावर काय बोलत आहे.’’
आरोप आणि लगेच सारवासारव
चव्हाण म्हणाले, ‘‘केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार पारदर्शक, ठोस आणि विकासाभिमुख कारभार करत आहे, अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यामुळेच ते दिशाभूल करणारे आरोप करत आहेत. नगरपालिकांच्या वेळी भाजपवर असेच आरोप केले. मात्र, तरीही जनतेने २८८ पैकी १३५ हून अधिक जागांवर भाजपला स्पष्ट कौल दिला. भाजप विकासाच्या मुद्यावर मत मागत आहे, तर महाविकास आघाडीला खोटे नरेटिव्ह पसरविण्याची सवय लागली आहे. अजित पवारांनी केलेले आरोप हे त्यांच्या स्वतःचे नसून भाडोत्री एजन्सींनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टचा भाग आहेत. यात पवार यांची चूक नसून, एजन्सीचा दोष आहे.’’
‘न खाऊंगा न खाने दूंगा’
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार पारदर्शकपणे विकास करत आहे. ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ याप्रमाणे पंतप्रधान मोदींची काम करण्याची पद्धत लोकांना आवडलेली आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भाजपच्या विचारधारेला जग स्वीकारायला लागले आहे. संपूर्ण देश एकत्र आलेला असताना विरोधक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विकास आणि हिंदुत्व ही रथाची दोन्ही चाके एकत्र असली पाहिजे, या विचारातून केंद्र आणि राज्य सरकार देशात आणि राज्यात काम करत आहे. उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी याच विचारधारेने प्रेरित होऊन काम करावे,’’ असा सल्ला चव्हाण यांनी दिला.
शत्रुघ्न काटे यांचे कान टोचले
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पिंपळे सौदागर प्रभाग
क्रमांक २८ मध्ये ‘भाजपचे शहराध्यक्ष तथा उमेदवार शत्रुघ्न काटे आणि माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यात नुरा कुस्ती’ सुरू असल्याच्या आशयाची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. या वृत्तात दोन्ही उमेदवारांनी सामंजस्याद्वारे आपापला विजय कसा सोपा करून घेतला, याचे विश्लेषण केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे कान टोचले. पिंपळे सौदागर प्रभागात कोणत्याही प्रकारची ‘सेटिंग’ खपवून घेतली जाणार नाही. नेत्यांनी चमकोगिरी टाळावी. पॅनेलमधील सहकारी उमेदवारांना सोबत घेऊन संपूर्ण पॅनेल कसा निवडून येईल, यावर लक्ष केंद्रित करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. पक्षाने सर्वांचा हिशोब घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली असून, कोणालाही सोडले जाणार नाही, अशी तंबीही चव्हाण यांनी उमेदवारांना दिली.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले...
- आमचे पाय जमिनीवर, मनात खोट नाही
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच पिंपरी चिंचवड स्मार्ट शहर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला एक नंबर करताहेत
- मोदींच्या नेतृत्वामुळेच शहरात मेट्रो प्रकल्प
- स्वतःला हिंदू म्हणण्याची हिंमत भाजपव्यतिरिक्त इतरांमध्ये नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.