बातमी वाचून पूर्ण आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोट येणार आहे.
पिंपरी, ता. १९ : भोसरी-इंद्रायणीनगर वैष्णोमाता प्राथमिक शाळा समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. पत्र्याच्या खोल्यांत शाळा भरते, विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या ताटात धूळ असते. महावितरणच्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचा खांब शाळेच्या मैदानातच आहे. या धोकादायक स्थितीत विद्यार्थी ‘अ-आ-इ-ई’चे धडे गिरवत आहेत. एकीकडे इमारती खासगी शिक्षण संस्थांना भाडेतत्वावर दिल्या जात असताना महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची मात्र हेळसांड सुरू आहे.
वैष्णोमाता शाळेची पहिली ते सातवीची पटसंख्या ६५० हून अधिक, तर बालवाडीचा पट १२० आहे. ही शाळा दोन सत्रांत भरते. शाळेच्या जागेचे आरक्षण असूनही इमारत अद्यापपर्यंत उभारण्यात आलेली नाही. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत इमारत अपुरी पडत आहे. वर्गखोल्यांचे क्षेत्रफळ कमी आहे. आवारातील धूळ विद्यार्थ्यांच्या नाका-तोंडात जाते. तुटके नळ ही समस्या तर नेहमीच भेडसावते. पावसाळ्यात शाळेत सापांचा वावर असतो. उंदीर आणि घुशींमुळे अस्वच्छता, दुर्गंधी पसरते. शाळेबाहेर ‘नो पार्किंग’ असूनही तेथे अवैधपणे वाहने उभी केली जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येतात. इतर शाळांप्रमाणे येथे बाके किंवा इतर सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना सतरंजीवर बसूनच ज्ञानार्जन करावे लागत आहे.
शाळेच्या प्रमुख समस्या
- प्रशस्त इमारतीचा अभाव. वर्गांमध्ये बाके नाहीत.
- वर्ग खोल्यांमध्ये अपुरा सूर्यप्रकाश, कोंदट वातावरण
- गुणांकनात शाळा ‘टॉप टेन’ असूनही खेळाचे मैदान नाही
- अपुरे स्वच्छतागृह, खेळणी मोडक्या अवस्थेत
- शाळेच्या आवारातच महावितरणचा खांब, वीजवाहिन्या
- शुद्ध पाण्याची यंत्रणा पूर्णपणे बंद
शाळेला प्रयोगशाळेची अपेक्षा
या शाळेत प्रयोगशाळा नसल्यामुळे विज्ञानाचे प्रयोग शिकवताना शिक्षकांना अडचणी येतात. ‘‘शाळेत शिक्षक आहेत, पण शैक्षणिक साधने उपलब्ध नाहीत. सुविधा देण्याबाबत सर्वच अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे,’’ असा आरोप पालक करत आहेत. ‘‘शाळेचा बौद्धिक दर्जा उत्तम आहे; परंतु अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही,’’ असेही पालकांचे म्हणणे आहे.
इमारत ‘स्टर्लिंग स्कूल’ला नाममात्र भाड्याने
वैष्णोमाता शाळेशेजारील महापालिका शाळेची इमारत सुस्थितीत आहे. या इमारतीत वैष्णोमाता शाळेतील विद्यार्थ्यांना बसविणे आवश्यक होते. तर ही इमारत ‘स्टर्लिंग स्कूल’ला नाममात्र भाड्याने दिलेली आहे. याचा करारनामा २०३२ पर्यंत आहे. तोपर्यंत महापालिका मुलांची अवस्था काय आहे? याचा अंदाज न बांधलेला बरा, असे काही पालकांनी सांगितले.
वैष्णोमाता शाळेतील खोल्या पत्र्याच्या आहेत. शाळा आवारात धूळ आहे. या शाळेकडे महापालिका प्रशासनाने कधीही लक्ष दिलेले नाही. आतापर्यंत इतक्या तक्रारी करूनही एकही अधिकारी पाहणीसाठी शाळेकडे फिरकलेला नाही. येथील समस्या सुटल्या पाहिजेत.
-ॲड. प्रभाकर तावरे-पाटील, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती
शाळेच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. शाळेला सुविधा मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. समस्या सुटण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
- वंदना इन्नाणी, मुख्याध्यापिका, वैष्णोमाता प्राथमिक शाळा, इंद्रायणीनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.