पुणे, ता. ४ : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. तालुकानिहाय राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडून आलेले सदस्य आपापली मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षश्रेष्ठींकडून तालुकास्तरीय बैठका घेतल्या जात आहेत. ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत नाही, तेथे समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. काही तालुक्यांत ओढाताण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मुळशी, जुन्नर आणि भोर येथे चुरस अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.
सभापती व उपसभापती पदांसाठी सोमवारी (ता. ९) निवडणूक होणार असून, त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांनी तालुकानिहाय बैठकांना वेग आला आहे. तालुकाध्यक्षांकडून नवनिर्वाचित सदस्यांसह काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठीही संभाव्य कल तपासला जात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांकडून बैठका सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात झालेल्या पक्ष बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करत पंचायत समित्यांमध्ये पक्षाच्या विचारांचा सभापती जास्तीत जास्त ठिकाणी निवडून यावा, यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय आघाडीचे पर्याय, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि समन्वयाचे फॉर्म्युला यांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सभापती पदांसाठी आरक्षणानुसार एक जागा अनुसूचित जमाती, एक अनुसूचित जमाती (महिला), दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग, दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), तीन सर्वसाधारण, तर चार जागा महिला राखीव असणार आहेत.
स्पष्ट बहुमत नसलेल्या ठिकाणांकडे लक्ष
जुन्नर पंचायत समितीत भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा सहा, शिवसेनेचे आठ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक अशी एकूण १६ सदस्यांची संख्या आहे. येथे कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने आघाडी पर्याय तपासले जात आहेत. भोरमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी चार अशा समान संख्येने सदस्य आहेत. त्यामुळे सभापती निवडीवेळी एका मतालाही मोठे महत्त्व राहणार आहे. मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तीन, भाजप एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. भोरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये समन्वय आणि आघाडीचा फॉर्म्युला निर्णायक ठरणार आहे.
पंचायत समितीची स्थिती...(कंसात निवडून आलेले सदस्य संख्या)
राष्ट्रवादी काँग्रेस - ८
मावळ (१०), बारामती (१०), इंदापूर (१६), राजगड (३), आंबेगाव (८), शिरूर (८), पुरंदर (४), हवेली (६)
भाजप - १
दौंड (८)
शिवसेना (ठाकरे) - १
खेड (९)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.