पुणे, ता. १७ : रासायनिक खत खरेदीसाठी दुकानांवर होणारी गर्दी आणि रांगा कमी करण्यासाठी जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर्स सेल’ (एफएफएस) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाइल ॲपवरून खताचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे. बुकिंगनंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड किंवा ई-टोकनच्या आधारे अधिकृत विक्री केंद्रातून खत घेता येणार आहे.
या प्रणालीची प्राथमिक चाचणी पुण्यातील अष्टापूर (ता. हवेली) येथे केंद्र सरकारच्या पथकाकडून घेण्यात आली होती. त्यानंतर खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. केंद्र सरकारच्या या प्रणालीची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या व पिकांच्या नोंदी, उपलब्ध खतसाठा आणि अधिकृत विक्री केंद्रांची माहिती प्रणालीशी जोडली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार खताचे नियोजन करून आगाऊ बुकिंग करता येईल. प्रणालीच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये, खतविक्रेत्यांमध्ये तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका व गावपातळीवर बैठका आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ॲपच्या वापराची माहिती दिली जाणार आहे.
अशी असेल प्रक्रिया...
एफएफएस ॲपवर आधार किंवा फार्मर आयडीच्या माध्यमातून ओटीपीने लॉगिन केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकांच्या नोंदीनुसार उपलब्ध खताचा कोटा दिसणार आहे. त्यानुसार खताचा प्रकार आणि गोण्यांची संख्या निवडून जवळचे अधिकृत विक्री केंद्र निश्चित करता येईल. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर मोबाइलवर क्यूआर कोड किंवा ई-टोकन मिळेल. विक्री केंद्रावर त्याची पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्याला खत वितरित केले जाणार आहे.
टप्प्याटप्प्याने विस्तार...
रासायनिक खत विक्रीसाठी एफएफएस प्रणालीची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केल्यानंतर तांत्रिक अडचणी दूर करून प्रणालीचा विस्तार करण्यात आला. १ सप्टेंबरपासून अहिल्यानगरसह आठ जिल्ह्यांत प्रणाली लागू करण्यात आली. आता २५ सप्टेंबरपासून पुण्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, बीड, धाराशिवसह विदर्भामध्ये अंमलबजावणी होणार आहे.
शेतकऱ्यांना काय फायदा?
- खत खरेदीसाठी दुकानावर जाण्यापूर्वी आगाऊ बुकिंग करता येणार
- उपलब्ध खताचा कोटा ॲपवर पाहता येणार
- आपल्या सोयीचे अधिकृत विक्री केंद्र निवडता येणार
- क्यूआर कोड किंवा ई-टोकनद्वारे बुकिंगची पडताळणी सुलभ होणार
- खताची मागणी आणि वितरणाचे नियोजन करणे शक्य होणार
एफएफएस प्रणालीमुळे खताची गरज, उपलब्ध कोटा आणि विक्री केंद्र यांचे नियोजन शेतकऱ्यांना आगाऊ करता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. २५ सप्टेंबरपासून पुणे जिल्ह्यात प्रणालीची अंमलबजावणी होत असल्याने शेतकऱ्यांना आणि खतविक्रेत्यांना तिच्या वापराबाबत आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे.
- अजित पिसाळ, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.