अविनाश ढगे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ ः इराण-इस्राईल संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशांमधून होणाऱ्या आयात-निर्यातीला फटका बसला आहे. त्यामुळे या संघर्षाचा पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) उद्योगांवर परिणाम झाला असून उद्योजकांचे करोडोंचे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक १४१ मोठे प्रकल्प आणि ८५ हजार २५३ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम सुरु आहेत. यामध्ये वाहन निर्मिती, औषध निर्मितीसह इतर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. वाहन निर्मितीचे हब अशी पुणे जिल्ह्याची ओळख निर्माण झाली असून दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहन निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. येथून वाहने, अभियांत्रिकी वस्तू आणि औषधांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातून ४ लाख ६८५ कोटींची निर्यात झाली आहे. यातील एक लाख सहा हजार ९६१ कोटींची निर्यात एकट्या पुणे विभागातून झाली आहे. तर पुणे विभागात पुणे जिल्ह्यातून ९० हजार १४ कोटींची निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीत २६.६९ टक्के वाटा पुणे विभागाचा होता. तर पुणे विभागात ८६.१८ टक्के वाटा एकट्या पुणे जिल्ह्याचा आहे.
संघर्षामुळे अनेक कंपन्यांच्या मोठ्या ऑर्डर रद्द झाल्या असून उत्पादन थंडावले आहे. निर्यातीसाठी पाठवलेला तयार मालाचे कंटेनर उरणमधील जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. उद्योगांवर मंदीचे सावट पसरले असून युद्धजन्य परिस्थिती आणखी आठ दिवस कायम राहिल्यास कच्च्या मालाची कमतरता जाणवणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. याचा दूरगामी परिणाम होणार असल्याचा अंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
----------
एमआयडीसीत या वस्तूंची आयात
- वाहनांचे सुटे भाग
- ॲल्युमिनियम
- पॉलिमर
- पेट्रोकेमिकल्स
----------
काय परिणाम होणार ?
- इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता
- कच्च्या मालाचा तुटवडा
- ऑर्डर रद्द होऊन उत्पादन थंडावेल
- डिलीव्हरीचा कालावधी लांबेल
- मालवाहतुकीचे दर वाढतील
- कंटेनर गेले किंवा आले नाही तर कच्च्या मालाची कमतरता जाणवेल
-------------
इंधनाच्या किमती वाढल्या की सर्वच वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भिती उद्योजकांमध्ये आहे.
- दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज
-----
आर्थिक वर्ष २०२५-२६ निर्यात (जानेवारी ते नोव्हेंबर २०२५)
वस्तू - किंमत (कोटीत) - टक्केवारी
अभियांत्रिकी - ४८,२५५ - ५३.६१
इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल घटक - १३,५४२ - १५.०४
वैद्यकीय - ८,५९३ - ९.५५
धातूची भांडी - ५,५७३ - ६.१९
रसायने - ४,०८९ - ४.५४
कृषी आणि अन्न प्रक्रिया - २,५६६ - २.८५
शेती, फलोत्पादन आणि संबंधित उत्पादने - १,५५७ - १.७३
प्लास्टिक आणि प्लास्टिक उत्पादने - १,२४२ - १.३८
कापड आणि पोशाख - १,१०७ - १.२३
कागद आणि पेपरबोर्ड - १,०६७ - १.१९
-----------
देश - निर्यात (कोटीत) - टक्केवारी
अमेरिका - १६,६२९ - १८.४७
सयुंक्त अरब अमिराती - ६,१८१ - ६.८७
मेक्सिको - ५,६८२ - ६.३१
हॉंगकाँग - ३,७८९ - ४.२१
ब्रिटन - ३,६१७ - ४.०२
जर्मनी - ३,३८२ - ३.७६
नेदरलॅन्ड - ३,०६८ - ३.४१
चीन - २,३९४ - २.६६
ब्राझील - २,३४१ - २.६०
सौदी अरेबिया - २,०६१ - २.२९
----------
२०२४-२५ निर्यात (कोटीत)
महाराष्ट्र - ५,५७,२७१ (देशाच्या एकूण निर्यातीत १५.३७ टक्के वाटा)
पुणे विभाग - १,४०,४७७ (राज्याच्या एकूण निर्यातीत २५.२० टक्के वाटा)
पुणे जिल्हा - १,१६,०३९ (पुणे विभागात एकूण निर्यातीत ८२.६० टक्के वाटा)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.