पुणे, ता. ४ ः ज्या तिकिटाला एरवी २०- २५ हजार रुपये लागत. त्यासाठी आता एक ते
दीड लाख रुपये मोजण्याची वेळ आली आहे. एवढे महागडे तिकीट घेऊन भारतात परतणे शक्यच नाही. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे असेल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही,’’ अशी भावना दुबईत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. भारतीय दूतावासाने अजूनही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
इराण आणि अमेरिका युद्धात संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील शहरे लक्ष्य झाली आहेत. त्यातही दुबईवर सातत्याने हल्ले होत आहेत. दुबईमध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे १५० हून अधिक महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत. त्यांतील काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, या युद्धाची त्यांना पोचलेली झळ दिसून आली. विमान कंपन्यांनीही दर वाढविले असल्यामुळे या विद्यार्थ्यांना परतणे अवघड झाले आहे.
मूळचा अकोल्याचा असलेला श्रेयस जोशी गेल्या सहा महिन्यांपासून दुबईतील अलकुझ भागात राहत आहे. कन्स्ट्रक्शन ॲंड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तो विद्यार्थी आहे. ‘‘मी राहत असलेल्या भागाजवळ क्षेपणास्त्राचा हल्ला झाला होता. त्यावेळी खूप भीती वाटली. परंतु, आता त्यातून सगळेच सावरत आहेत. स्थानिक प्रशासन नागरिकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता कॉलेज तर बंद झाले आहे. वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे आपल्या देशात परतायचे आहे पण विमानच उपलब्ध होत नाही. जी काही वाहतूक सुरू आहे, त्याचे दर गगनाला भिडले आहेत. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या ते आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे दर कमी होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.’’
संभाजीनगरचा ओजस जैन हा दुबईमध्ये फायनान्स ॲंड मॅनेजमेंट विषयाची पदव्युत्तर पदवीचे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण घेत आहे. विद्यार्थी वसतीगृहात तो राहत आहे. त्याचेही कॉलेज सध्या ऑनलाइन सुरू आहे. तो म्हणाला, ‘‘घरी परतण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून प्रयत्न करीत आहे पण विमानच उपलब्ध होत नाही. विमान असले तरी, त्याचे दर आवाक्याबाहेर आहे. खाद्यपदार्थ मिळत असले तरी, आता भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोणत्याही क्षणी कोठेही हल्ला होईल, अशी भीती आहे. त्यामुळे कधी एकदा घरी जातो, असे झाले आहे. भारतीय दूतावासाकडून मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’
--------------
ओमान सीमेवरून पुन्हा दुबईत
घरी परतण्याच्या ओढीने अनेक विद्यार्थी मिळेल तो पर्याय स्वीकारत आहेत. दुबईचे नागरिकत्त्व असलेल्या नागरिकांना ओमानमध्ये पोचल्यावर लगेच व्हिसा (व्हिसा ऑन अरायव्हल) दिला जातो. हे ऐकून काही भारतीय विद्यार्थ्यांचा ग्रुप मस्कत विमानतळावर पोचला. तेथून हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे, असे त्यांना समजले होते. परंतु, व्हिसा नसल्याने ओमानच्या सीमेवरून त्यांना परत दुबईत पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांना मदत करा, पैशांची अडचण आहे, असे त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी आता भारतीय दूतावासाकडून काही तरी मदत मिळेल, या आशेवर आहेत.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.