खळद, ता. ३० : श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर (जि. सातारा) येथे प्रथम मानाच्या खळद, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या श्री संत तेल्या भुत्याच्या कावडीने तेल्या भुत्याचे वंशज कावडीचे मानकरी शिवयोगी संत भुतोजी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भक्ती आणि शक्तीच्या जोरावर अवघड असा मुंगी घाट मानवी साखळीच्या साह्याने सर केला. येथील स्वयंभू शंभू महादेवाला कऱ्हेच्या पाण्याने जलाभिषेक घातला.
श्री क्षेत्र एखतपूर (ता. पुरंदर) येथील भुतोजीबुवा तेली यांच्या जळत्या घराची जागा व तेलाचा घाणा येथे प्रदक्षिणा घालून समाधीचे दर्शन घेऊन खळद येथून शाही मिरवणुकीने रामनवमीला (ता. २६) पायी निघालेला कावड सोहळा कोळविहीरे, जोगवडी, मुर्टी, वडगाव निंबाळकर, जिंती, फलटण, निंबळक नाका असा प्रवास करत द्वादशी सोमवारी (ता. ३०) पहाटे रणखिळा येथून सकाळी कोथळे येथे पोहोचला. येथे प्रशासनाच्या वतीने तसेच माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यावतीने कावडीचे स्वागत करण्यात आले. तर नानासाहेब तेली महाराज (इस्लामपूर) यांच्या कावडीची भेट तसेच लहान मोठ्या काठ्या कावडी यांची भेट होऊन दुपारी २.३० वा. कावडीचे मुंगी घाटाकडे प्रस्थान झाले. ४.४५ वाजता घाट पायथ्याशी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून कावडीचे स्वागत केले. यानंतर महाआरती होऊन ५.१० वा. कावडीच्या घाट चढण्यास प्रारंभ झाला.
नानामहाराज खळदकर व मागे ढोल ताशांच्या गजरात, सनईच्या निनादात मानवी साखळीच्या साह्याने ‘हर हर महादेव’चा जयघोष करत एक एक टप्पा पार करत घाटाची चढण करणारा कावडीचा सोहळा मनोहारी दिसत होता. हा नेत्रदीपक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविकांनी घाट माथ्यावर गर्दी केली होती.
घाटमाथ्यावर उपविभागीय महसूल अधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत, तहसीलदार विकास अहीर आदींनी कावडीचे स्वागत केले. पुढे कावड प्रथम अमृतेश्वर मंदिर व नंतर मुख्य मंदिरात नेऊन ‘श्रीं’ना कऱ्हा जलाचा जलाभिषेक केला. येथे शंभू महादेव देवस्थान, समस्त शिखर शिंगणापूर बडवे मंडळी यांच्याकडून कावडीची पूजा करीत मानाचा ध्वज दिला.
भक्ती- शक्तीचा अनोखा संगम
मुंगी घाट भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम असून चार दिवस रखरखत्या उन्हात प्रवास करून आल्यावर मुंगी घाटाला सुरुवात करताच वातावरणात बदल होऊन आभाळ झाकोळले जाते व गार वाऱ्याची झुळूक सुरू होते व भाविक भक्तिभावाने हा घाट लिलया पार करतात, असे प्रथम मानाच्या श्री संत तेल्या भुत्याच्या कावडीचे मानकरी शिवयोगी नाना महाराज खळदकर यांनी सांगितले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.