पिरंगुट, ता. १६ : लवळे (ता. मुळशी) येथील मोरया डोंगरावर प्राचीन बैठ्या खेळांचे अवशेष सापडले आहेत. आज हे अवशेष अनेक ठिकाणी उघड्यावर, नैसर्गिक झीज आणि मानवी दुर्लक्षामुळे धोक्यात आलेले आहेत.
लवळे येथील डोंगरावरील ‘घोडं खडक’ या नावाने संबोधले जाणाऱ्या या परिसरात हे विविध खेळपट, खेळाचे रेखाटन आणि त्यांचे अवशेष पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने मंकाळा, सारीपाट, वाघ- बकरी आणि चौक भरा आदी खेळांचे एकूण आठ पट आढळून आले आहेत. हे अवशेष इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून ते सतराव्या शतकादरम्यानचे असू शकतात, असा अंदाज आहे. येथील खेळांचे अवशेषांची पाहणी ऐतिहासिक वास्तूंचे अभ्यासक आकाश मारणे यांनी केली. त्यानंतर या विषयाचे अभ्यासक सोज्वल साळी यांनी याबाबतची अधिक माहिती दिली.
लवळे, पिरंगुट, भूकुम, मारणेवाडी, उरवडे, तसेच मुळशी तालुक्यातील विविध गावांतील डोंगरांवर असे खेळपट आढळतात. त्यातील मारुंजी येथील जगातील सर्वात मोठा खेळपट म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेची आणि जीवनशैलीची अमूल्य साक्ष देतात. या मौल्यवान वारशाचे संवर्धन आणि जतन करणे हे केवळ शासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आकाश मारणे यांनी सांगितले.
लवळे येथील ऐतिहासिक संदर्भ
सातवाहन काळापासून कोकण ते देश असा व्यापार चालत असे. त्यासाठी मुळशी तालुक्यातून अनेक व्यापारी घाटमार्ग जात होते. या व्यापारी मार्गांवर लष्करी चौक्या (तपासणी नाके) आणि विश्रांतीची ठिकाणे होती. अशा जागांवरच हे खेळपट खडकांमध्ये कोरलेले आढळतात. लवळे गावच्या डोंगरावर असणारे हे खेळपट इसवी सन पूर्व २५० (सातवाहन काल) ते इसवी सन १७ वे शतक (मराठाशाही) या दरम्यानचा प्राचीन ते मध्ययुगीन काळ असण्याची शक्यता आहे. येथील डोंगरावरील ‘घोडं खडक’ या परिसरात हे खेळपट आहेत. या ठिकाणी खडकांमध्ये घोड्याच्या पायांचे ठसे आढळून येतात. त्यामुळे या जागेला ‘घोडं खडक’ असे म्हटले जाते. येथे शिवलिंग आणि इतरही काही आकृत्या पाहायला मिळतात.
सातवाहन काळापासून मराठाशाहीपर्यंतच्या विस्तृत कालखंडाचा साक्षीदार असलेले मुळशी तालुक्यातील विविध ठिकाणच्या डोंगरवाटांवरील खेळपट केवळ मनोरंजनाची साधने नाहीत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि व्यापारी इतिहासाचे ते मौन दस्तऐवज आहेत. या प्राचीन खेळांच्या अवशेषांचे संरक्षण करणे आणि आपला हा समृद्ध व सांस्कृतिक ठेवा भावी पिढ्यांसाठी जतन करणे काळाची गरज आहे.
- आकाश मारणे, ऐतिहासिक वास्तूंचे अभ्यासक
PRG25B05033