पिरंगुट, ता. ३१ : मुळशी तालुक्यातील स्टोन क्रशर बंद असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात बांधकाम क्षेत्रावर परिणाम होत असून, अनेक विकासकामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. खडी, क्रश सॅण्ड या अत्यावश्यक बांधकाम साहित्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा फटका बांधकाम साहित्याचे विक्रेते, बांधकाम व्यावसायिक, वाहतूकदार तसेच वाहनचालकांना बसत आहे.
तालुक्यातील बहुतांश बांधकामे ही स्थानिक क्रशरवर अवलंबून आहेत. मात्र, सध्या क्रशर बंद असल्याने खडी व क्रश सॅण्ड इतर तालुक्यांतून मागवावी लागत आहे. लांब अंतरावरून साहित्य आणावे लागत असल्याने वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, परिणामी खडी व क्रश सॅण्ड सारख्या बांधकाम साहित्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी घरबांधणी अधिक महाग झाली आहे. रस्ते, खासगी बांधकामे, तसेच इतर विकासकामे ठप्प झाली असून, याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. तालुक्यातील शेकडो डंपर, ट्रक व इतर वाहने धूळ खात उभी असून, वाहनचालक, हमाल, कामगार व संबंधित घटकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. लवकरात लवकर क्रशर सुरू करून बांधकाम साहित्याचा नियमित पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी तालुक्यातील नागरिक, बांधकाम व्यावसायिक व वाहतुकदारांकडून होत आहे.
याबाबत बोलताना बांधकाम साहित्य वाहतूकदार नीतेश शिळीमकर म्हणाले की, ‘‘तालुक्यातील क्रशर प्लांट बंद असल्याने साहित्याच्या तुटवड्याने आमच्या गाड्या उभ्या आहेत. पूर्वी स्थानिक क्रशर सुरू असताना प्रत्येक गाडीमधून दिवसभरात दोन ते तीन ट्रीप होत असत. आता क्रशर बंद असल्यामुळे नाइलाजाने तळेगाव, वाघोली व नांदोशी येथून मटेरिअल आणावे लागत असल्याने दिवसभरात एक ट्रीपही होणे अत्यंत अवघड झाले आहे. आमचे ड्रायव्हर, कामगारांचे, वाहनांचे हप्ते व दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे.’’
आमची क्रशर बंद झाल्याने कामगारांना काम नाही. वाहनांवरील बँक कर्जाचे हप्ते, विमा, देखभाल खर्च तसेच दैनंदिन खर्च सुरूच असल्याने आम्ही अत्यंत आर्थिक अडचणीत सापडलो आहोत.
- अभय चव्हाण, स्टोन मेटल व क्रशर चालक
माझ्याकडे तीन वाहने असून, हा व्यवसाय पूर्णपणे स्थानिक क्रशरवर अवलंबून आहे. तालुक्यातील स्टोन क्रशर प्लांट बंद असल्यामुळे खडी व क्रश सॅण्डचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे माझी वाहने साहित्याअभावी उभी राहिली असून, तालुक्यातील अनेक बांधकामे रखडली आहेत. बाहेरून माल आणायचा, तर जड वाहतुकीची तीव्र कोंडी व ‘नो एन्ट्री’चे वेळापत्रक यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. चालक व कामगारांचा खर्च, वाहनांचे फायनान्स हप्ते आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. कर्जाचा हप्ता दर महिन्याला एक लाखाचा भरायचा कसा? या समस्येने आम्ही मानसिक तणावात आहोत.
- आकाश काळे, वाहतूकदार
मुळशीतील स्टोन क्रशर बंद असल्यामुळे खडी व क्रश सॅण्डचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आमच्या भागातील बांधकामे थांबली असून, बांधकामे बंद असल्यामुळे सिमेंटची मागणीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. पूर्वी रोज साधारणपणे १०० ते १५० पिशव्या सिमेंटची विक्री होत होती. सध्या ५० ते ६० बॅग विक्री होणेही कठीण झाले आहे. त्यामुळे दुकानाचा दैनंदिन खर्च, कामगारांचे पगार, वाहतूक खर्च तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणे अवघड झाले आहे.
- धिरज मारणे, स्टोन डेपो व्यावसायिक, खारवडे
05080