पाणीदार मुळशी
मुळशी तालुका तसा पावसाचा प्रदेश असल्याने अपवाद वगळता या तालुक्यात दरवर्षी पाऊस सरासरीने पडतोच. बऱ्याचदा येथील ताम्हिणीमध्ये पडलेल्या पावसाने चेरापुंजीचा उच्चांक मोडला होता. त्यामुळे पावसाचे प्रमाण चांगले असल्याने तालुक्यात पाणी मुबलक उपलब्ध असते. तालुक्यातील विविध स्रोतांद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे पिण्याचे, शेतीचे, तसेच औद्योगिक वापरासाठीचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच मुळशी तालुक्याला चांगले दिवस आलेले आहेत. मात्र, त्याचा वापर नियोजनबद्ध आणि योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.
- धोंडिबा कुंभार, पिरंगुट
पाण्याचे स्त्रोत
मुळशी तालुक्यात असलेली मुळशी धरण आणि टेमघर धरण या मोठ्या धरणांशिवाय ठिकठिकाणचे बंधारे, विहिरी, विंधन विहिरी, याशिवाय मुळा, मुठा आणि वळकी आदी नद्यांतील पाणी मुळशीकरांना उपलब्ध असते. पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक व खासगी विहिरी, तसेच विंधन विहिरीही तालुक्यात मुबलक झालेल्या आहेत. मात्र, शासनाच्या योजनेतून पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी येथील टाटांच्या मालकीचे मुळशी धरण, तसेच शासनाच्या मालकीचे टेमघर धरण मुळशीकरांबरोबरच पुणेकरांना वरदान ठरलेले आहे.
मुळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची संख्या नऊ असून, वळकी नदीवर तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. मुळा नदीवरील कृषी पंपांची संख्या ११५०, तर वळकी नदीवर २५० कृषी पंप आहेत. मुळा नदीवरील औद्योगिक वापरासाठीच्या पाण्याच्या योजनांची संख्या ४४ आहे. मुळा नदीवरील कृषी पंपांमुळे ३००० हेक्टरपेक्षा जास्त कृषी क्षेत्र ओलिताखाली आलेले असून, वळकी नदीवरील कृषी पंपामुळे ८४४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. त्यामुळे गावोगावच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजना या नद्यांवर अवलंबून आहेत. मुळा नदीच्या पाण्यावर सुमारे ११, तर वळकी नदीच्या पाण्यावर ६ ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. पावसाळ्यानंतर मुळा नदीला पाण्यासाठी मुळशी धरणावर अवलंबून राहावे लागते, तर वळकी नदीला हाडशी एक व दोन, तसेच वाळेण येथील बंधाऱ्यांचे पाणी उपलब्ध होते.
याशिवाय तालुक्यात पाटबंधारे विभागाचे एकूण १२ प्रकल्प आहेत. त्यात गडादवणे, उरवडे, मारणेवाडी, खांबोली, पिंपळोली, रिहे, हाडशी १, हाडशी २, वाळेण, सालतर, चिंचवड व शेरे आदींचा समावेश आहे. गेल्यावर्षी या विविध ठिकाणच्या प्रकल्पांतील पाण्यावर ३९९३ हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली आलेले असून, मुळशी धरणाच्या पाण्याचा २४०७ हेक्टर शेतीक्षेत्राला लाभ झाला आहे.
मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही मुळशीकरांसाठी खूपच वरदान ठरलेली आहे. या योजनेवर सध्या २१ ग्रामपंचायतींमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. रोज सरासरी ३० ते ३५ लाख लिटर पाणी वापरले जाते. वर्षभराचा विचार केल्यास सुमारे बाराशे लक्ष लिटर पाणी वापरले जाते. प्रति माणसी प्रतिदिनी ५० लिटरप्रमाणे सुमारे ६० हजार नागरिक याचा लाभ घेतात. सध्या सुरू असलेल्या या मुळशी प्रादेशिक योजना टप्पा १ मध्ये माले, संभवे, दिसली, जामगाव, शेरे, अकोले, कळमशेत, शिळेश्वर, भादस, असदे, खुबबली, रावडे, करमोळी, सावरगाव, चाले, दखणे, पौड, कोंढावळे, दारवली, मुगावडे, अंबडवेट, घोटावडे, भरे, पिरंगुट, कासार आंबोली, आंदेशे, मुलखेड, मांदेडे आदी २८ गावांचा समावेश होतो.
मुळशीतील वाढत्या नागरिकरणामुळे मुळशी प्रादेशिक योजना टप्पा क्रमांक २ नियोजित असून, त्याचे साठवण टाक्या, पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र टाटा कंपनीने या योजनेसाठी लागणारे वाढीव पाणी देण्यास अद्याप नकार घंटा दर्शविली आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यास तालुक्यातील २२ गावांतील नागरिकांना लाभ होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या मुळशी प्रादेशिक योजना टप्पा क्रमांक २ मध्ये चांदे, नांदे, माण, हिंजवडी, मारुंजी, उरावडे, लवळे, भुकुम, भुगाव, वळणे, कुळे, नाणेगाव, चिखलगाव, साठेसाई, नांदगाव, कोळवण, वाळेण, भालगुडी, हाडशी, काशिग, होतले, डोंगरगाव आदी एकूण २२ गावांचा समावेश केला आहे. या योजनांतून प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी मिळणार आहे. त्यासाठी टाटा कंपनीने वार्षिक २९.४४ दलघमी इतके पाणी आरक्षित करावयाचे
आहे. जॅकवेल बांधण्यासाठी दहा गुंठे जागा व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ५ एकर जागाही टाटा पॅावरने उपलब्ध करून द्यावयाची आहे.
बारगळलेली टेमघर योजना
टेमघर धरण मुठा खोऱ्यातील अठरा गावांतील भूमीपूत्रांसाठी वरदान ठरलेले आहे. मुठा खोऱ्यातील विविध गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना मुठा नदीवर असून त्याचा लाभही होत आहे. धरणातील पाणी मुठा नदीत अपवाद वगळता बारमाही उपवलब्ध झाल्याने शेतीलाही फायदा होत आहे. मात्र या धरणातील पाणी मुठा खोऱे व मुळशीच्या पूर्व भागातील नागरिकांना मिळावे म्हणून टेमघर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आखली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार या योजनेचा आराखडा व सुमारे ७१ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविले होते.
सुमारे चाळीस किलोमीटर अंतराच्या परिसरातील टंचाईग्रस्त गावांना ही योजना जलदूत ठरणार होती. मुठा खोऱ्यातील अठरा, तर पूर्व मुळशीतील सात गावांना ही योजना वरदान ठरणार होती. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून प्रस्तावित असलेल्या या योजनेचे शीर्षकही बदलून ते मुख्यमंत्री पेयजल योजना असे झाले होते. ही योजना राबविल्यास मुठा खोऱ्यातील टेमघर, कोळावडे, लवार्डे, खारावडे, आंदगाव, वातुंडे, वांजळे, माळेगाव, जातेडे, डावजे, कातवडी, कोंढूर, वेगरे, मुठा, वेडे आणि भोडे आदी गावे, तर पूर्व भागातील गावे मुकाईवाडी, लवळे, भुकूम, भूगाव, बावधन, आंबेगाव व मारणेवाडी आदी गावांना या योजनेचा लाभ होईल. गुरुत्ववाहिनीने या पाण्याचे वितरण होणार असल्याने मोटरपंपासाठी लागणारी वीज वाचणार आहे. पूर्व भागातील गावांसाठी मुळशी प्रादेशिकचा समावेश असल्याने किमान मुठा खोऱ्यातील गावांसाठी ही योजना राबविणे गरजेचे आहे.
वनराई बंधारे
मुळशीतील मुळा तसेच वळकी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे शेतीला वरदान ठरत आहेत. या बंधाऱ्यांमुळे पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी मुबलक उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मुळशीत वनविभागाने बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांमुळे तेथील परिसरातील पशूपक्ष्यांच्या तसेच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काळासाठी सुटला आहे.
पिण्याच्या पाण्याची सध्याची स्थिती
मुळशीत मुळशी प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी ज्या गावांना उपलब्ध आहे. तेथील नागरिकांना पिण्यासाठीचे पाणी विकत घ्यावे लागत नाही. मात्र, ही योजना सोडल्यास नदी, विहीर अथवा विंधन विहिरीतून पुरवठा केलेल्या पाण्यासाठी घरोघरी आरओचे फिल्टर बसवावे लागत आहेत. अलीकडे मुळशीच्या पूर्व पट्ट्यातील बहुतांशी नागरिक बाटलीबंद पाण्याचा वापर करीत आहे. त्यामुळे मुळशीत पाण्याची मुबलकता असून त्याचा योग्य वापर व नियोजन केल्यास इथल्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीसाठीच्या पाण्याचा तसेच औद्योगिक वापरासाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.