पिरंगुट, ता. १५ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली, तरी प्रबळ इच्छुक आणि दावेदार उमेदवारांनी मात्र मतदारांपर्यंत पोचण्यासाठी गेल्या सुमारे सहा महिन्यांपासूनच प्रचार, गाठीभेटी, गावभेट दौरा, धार्मिक सहली, लकी ड्रॅा, मेळावे आदी विविध उपक्रम राबविलेले आहेत. त्यात आणखी भर म्हणून आता तर हा प्रचार थेट स्मशानभूमीपर्यंत पोचला आहे.
एरवी दशक्रियेवेळी काक स्पर्श झाल्यावर स्मशानभूमीमध्ये नातेवाइकांसह कुणीच रेंगाळत नव्हते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यातील स्मशानभूमीसुद्धा आता प्रचाराचा आणि मतदारांपर्यंत पोचण्याचा मार्ग झाला आहे. इच्छुक उमेदवारांनी या स्मशानभूमीत मतदार संपर्कासाठी हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे. बऱ्याचदा नातेवाईक, सगेसोयरे, मित्रपरिवार, स्थानिक ग्रामस्थ यांच्याही अगोदर ही उमेदवार मंडळी स्मशानभूमीत हजर असतात. अंत्यविधी असो अथवा दशक्रिया असो, प्रत्येक विधीला सगळे इच्छुक उमेदवार जातीने हजेरी लावत आहेत. त्यामुळे शोकाकुल कुटुंब वगळता त्यांचे नातेवाईक, उमेदवारांचे समर्थक, आर्थिक लाभार्थी यांचे आवर्जून रेंगाळणे नित्याचे झाले आहे. स्मशानभूमितही उमेदवारांचे समर्थक गटागटाने उभे राहून निवडणुकीची, मतदारांची आणि नियोजनाची चाचपणी करताना दिसतात. भर थंडीतही निवडणुकीचे वातावरण उबदार होऊ लागलेले आहे.