पौड, ता. ६ : मुळशी तालुक्यातून कोकणात जाणारा पुणे-कोलाड हा राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर गाव मार्ग कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे विद्रूप झाले आहेत. एकीकडे तालुक्यात मुबलक प्रमाणात निसर्गसंपन्नता असताना तालुक्याच्या वाहतुकीची जीवनवाहीनी असलेल्या रस्त्यांच्या बाजूला स्थानिक आणि भाडेकरू घरातील कचरा प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून त्याचे पुडके बिनदिकत फेकत आहेत. या कचरा आणि प्लॅस्टिक प्रदूषणामुळे तालुक्याच्या निसर्गसौंदर्याची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे.
तालुक्यात बहुतेक ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचे रस्ते रुंद, सिमेंट कॉंक्रिटचे, डांबरीकरणाचे झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेगही सुस्साट आहे. परिणामी प्रवासाचा वेळही वाचू लागला आहे. तालुक्याच्या निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळे, गडकिल्ले आणि पर्यटनस्थळांचा आनंद लुटण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड भागातील अनेक भाविक आणि पर्यटनप्रेमी मंडळी येतात. त्यामुळे स्थानिकांच्या छोट्या-मोठ्या व्यवसायाला चालना मिळून अर्थकारणालाही गती आली आहे.
त्यामुळे कोकणात जाणारा पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर सार्वजनिक रस्ते म्हणजे मुळशीकरांसाठी जीवनवाहिनी झाले आहेत. तथापि या जीवनवाहिनीला नागरिकच गलिच्छ स्वरूप देत आहेत. घरातील कचरा, प्लॅस्टिक, सडके, कुजके अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ते दुचाकी, चारचाकीतून आणून बेधडकपणे महामार्गाच्या कडेला फेकून देत आहेत. याशिवाय घरातील खराब झालेले फर्निचर, सोफा, गाद्या, उश्या तसेच इतर अडगळीच्या वस्तूही महामार्गाच्या कडेला टाकल्या जात आहेत.
---
कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण :
चांदणी चौकापासून घनकचऱ्याचे दर्शन होते. भूगाव, भुकुम, पिरंगुट घाट, शिंदेवाडी, कासार आंबोली, सुतारवाडी घाट, पौड या ठिकाणी गावाबाहेरील बाजूला लांबलचक कचरा, प्लॅस्टिकचे पुडके पसरलेले दिसतात. मुंबई-बंगळूर महामार्गावर बावधनच्या हद्दीतही कचऱ्याचे ढिगारे दिसतात. सुस-नांदे, हिंजवडी, माण, मारुंजी अशा शहरीकरण झालेल्या भागातील सार्वजनिक रस्ते म्हणजे कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण झाले आहे.
----
वन्यजीव, पक्ष यांच्या जीवितास धोका :
रस्त्यावर टाकलेल्या या घनकचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते, माशांची पैदास होऊन रोगराई पसरण्याची भीती आहे. पाळीव जनावरे भुकेपोटी प्लास्टिक खातात, त्यांच्यासह इतर वन्यजीव, पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. कचरा उघड्यावर जाळल्याने वायू प्रदूषण होते. भटक्या कुत्र्यांच्या वावर वाढला आहे. कचऱ्याच्या विघटनामुळे नद्यांचे, ओढ्यांचे प्रदूषण होऊन त्यातील जैवविविधतेस धोका निर्माण झाला आहे. रस्त्याकडील हिरव्यागार परिसराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. घनकचऱ्याच्या विळख्यामुळे तालुक्यात कचरा व्यवस्थापनाबरोबरच पर्यावरण संतुलन राखण्याचे मोठे आव्हानही उभे ठाकले आहे.
---
कोणत्या उपाययोजना कराव्यात हा प्रशासनापुढे प्रश्न :
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी विविध गावांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. काही गावांनी येथे कचरा टाकणारा गाढव आहे, अशा आशयाचे गाढवाचा फोटो असलेले फ्लेक्स लावले. पण काही बुद्धीहिन नागरिकांनी त्या फ्लेक्सजवळ कचरा टाकण्यास मागे-पुढे पाहत नाही. काहींनी कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पण त्यापासून इतरांना काहीच धडा मिळत नाही. काही ग्रामपंचायती नियमितपणे कचरा उचलत असल्याने ही जागा कचरा टाकण्याचे ठिकाणचं आहे, असे समजून नागरिक कचरा टाकतात. तर काहींनी घंटागाडी सुरू केली. घरासमोर गाडी यावरूनही आपल्या सोयीस्कर वेळेत घंटागाडी येत नसल्याने कामावर जाता-जाता चालत्या गाडीतून कचरा फेकण्याचा धाडस काहीजण करतात.
----
तहसीलदारांना निवेदन :
महामार्गाच्या ठिकठिकाणी पडणाऱ्या कचऱ्याचे फोटो प्रजासत्ताक भारत पक्षाने सोशल मीडियावर व्हायरल करीत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. पुणे-कोलाड रस्त्यावरील विविध ठिकाणांचा कचरा कोणी काढायचा? कुठे नेऊन टाकायचा? तसेच पुन्हा त्या ठिकाणी कचरा टाकू नये याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कोणी करायची? अशा विविध प्रश्नांबाबत नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची बैठक घ्यावी आणि कचऱ्याचा हा प्रश्न निकाली काढावा, अशी विनंतीही पक्षाच्या वतीने तहसीलदार रणजीत भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.