पुणे

महाराष्ट्राचे जननायक : अजितदादा पवार

CD

समाजकारण, राजकारण, अर्थकारणात महाराष्ट्र हा देशात केंद्रस्थानी असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. राजकीय पातळीवर महाराष्ट्राची सकारात्मक छबी निर्माण करण्यात यशवंतराव चव्हाणसाहेबांपासून ते शरदचंद्रजी पवारसाहेब यांसारख्या महान नेत्यांचा मोठा सहभाग आहे. यातच आणखी एक नाव आपल्या कार्यकर्तृत्वानं जोडलं गेलयं ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात दादांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने राजकारण आणि समाजकारणावर एक आगळा वेगळा ठसा उमटविलाय. त्यांच्यातली अनोखी स्वभाववैशिष्ट्ये आणि कामाच्या शैलीमुळे त्यांचे वेगळेपण महाराष्ट्राला भावले. स्पष्टवक्तेपणा, समयसूचकता, कुशल प्रशासक, मुत्सद्दी राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या कुटुंबवत्सल दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या पैलूंवर टाकलेला हा प्रकाशझोत...

- अॅड.संदीप कदम
मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

दादांच्या वाढदिवसानिमित्त लिहिताना माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उठतो. कारण दादा ही केवळ एक राजकीय व्यक्तिरेखा नाही, तर ती एक भावना आहे, ज्या भावनेत धडाडी आहे, जिद्द आहे. तसेच प्रत्येक निर्णयामागे महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक भाषण आणि जनहितासाठी उचलेले प्रत्येक पाऊल हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी असते. म्हणूनच दादांचं नाव घेताना प्रत्येकाच्या हृदयात एक खास जिव्हाळा आणि आदर निर्माण होतो.
दादा सामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचं प्रतीक आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीत, शब्दात आणि वागणुकीत एक स्पष्टपणा असतो. दादांची खासियत म्हणजे त्यांचं कृतिशील नेतृत्व’. केवळ घोषणा करून मोकळं होणं हे त्यांचं काम नाही. तर ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरतात, कामाचा आढावा घेतात, अधिकाऱ्यांना जाब विचारतात आणि आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ अमलात आणतात. त्यांचं प्रत्येक वाक्य ठाम असतं, म्हणूनच जनतेचाही त्यांच्यावर गाढा विश्वास बसला आहे. त्यांच्या आवाजातला दमदारपणा आणि मनातली माणुसकी हीच त्यांची खरी ताकद आहे.
महाराष्ट्र बदलतोय, विकासाच्या नव्या वाटा शोधतोय. पण त्या वाटांचा पाया कोणी घातला, हे विसरता येत नाही. दादा हे त्या पायामधील मजबूत खांब आहेत. कधी कधी लोक त्यांच्यावर टीका करतात, पण दादा शांत राहतात. कारण त्यांना माहीत आहे की, शेवटी इतिहास त्यांचं खरं मूल्य ठरवेल. त्यांना ना प्रसिद्धीची हाव आहे, ना भावनिक गाजावाजाची. त्यांना फक्त महाराष्ट्राचा विकास हवा आहे. त्यांचं जीवन हेच शिकवते की जेव्हा जबाबदारी अंगावर पडते, तेव्हा तडजोड न करता पुढे चालायचं. आज जरी राजकारणात नाना प्रकारचे बदल होत असले तरी अजितदादा हे नाव स्थिर आहे. एक विश्वासाचे, शक्तीचे आणि सेवाभावाचं त्यांच कार्य आणि जनतेवरील निष्ठा याच गोष्टींनी खऱ्या अर्थानं त्यांना "दादा" बनवलय. त्यामुळे दादांचा वाढदिवस केवळ त्यांच्या जन्माचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या प्रवासातील एका तेजस्वी पर्वाचा उत्सव आहे.
दादा म्हणजे निष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यांचा संगम. ज्यांनी संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतलय. साहेबांचा राजकीय वारसा लाभलेला असतानाही, दादांनी प्रामाणिकपणा, कष्ट आणि परिणामकारक कामगिरीच्या जोरावर स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलय. त्यांच्या भाषणात जरब असते, बोलण्यात स्पष्टता असते. गोड बोलून कोणालाही फसवणं त्यांना जमत नाही. कारण त्यांना "काम करून दाखवणं" हेच अधिक महत्त्वाचं वाटतं. "विकास" ही केवळ घोषणा नाही, तर त्यांची खरी आस्था आहे. त्यांची लोकप्रियता ही त्यांच्या कामगिरीमुळे आहे. नाहीतर आजच्या राजकारणात नाव टिकवणंही अवघड झालं आहे. पण दादा मात्र प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहतात. पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी.
दादा ज्या ज्या खात्याचे मंत्री बनले त्या खात्याचा कारभार त्यांनी अमूलाग्रपणे बदलला. काही वर्षापूर्वी ऊर्जा खात्याचे मंत्रिपद हे काटेरी मुकुट बनले होते. परंतु दादांनी या खात्याचा कारभार

स्वीकारल्यानंतर नियोजनबद्धपणे काम करून राज्यातील विजेची समस्या आटोक्यात आणण्यास यश मिळविले. आज जो आपण अखंडित वीजपुरवठ्याचा आनंद घेत आहोत, त्याचे श्रेय ऊर्जामंत्री असताना अजितदादांनी घेतलेल्या निर्णयात असल्याचे पहावयास मिळते. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दादांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या वित्त खात्याचे आणि इतर अनेक खात्यांचे जबाबदारीने नेतृत्व केले आहे. कामात गंभीरता आणि कर्तव्यभावना हे त्यांचे मुख्य गुणधर्म आहेत. दादांचा स्वभाव काहीसा कडक असल्याचे बोलले जाते, विशेषतः प्रशासकीय बाबतीत. वेळेचे काटेकोर पालन, तत्काळ ठोस निर्णय आणि निष्काळजीपणावर त्वरित कारवाई, हे त्यांची कार्यपद्धती पाहणाऱ्यांना जाणवते. ग्रामीण भागातील दौरे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील विशेष लक्ष, अधिवेशनात मांडलेले प्रस्ताव त्याचे दिलेले स्पष्टीकरण आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची पद्धत यामुळे ‘दादा’ म्हणजे आपला हक्काचा माणूस अशी घराघरात ओळख पोचली आहे.
दादांचे बळीराजाशी एक भावनिक नाते आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला प्रचंड कष्ट सोसावे लागतात. त्याची ही अवस्था पाहून खानदानी शेतकरी असलेले दादा दुष्काळातील जनतेला दिलासा देण्यासाठी उन्हातान्हात, भरपावसातही फिरतात. बांधावर जाऊन बळीराजाला दिलासा देतात. त्यातून दुष्काळग्रस्त शेतकरी, पिण्याच्या पाण्यासाठी दही दिशा फिरणाऱ्या माता-भगिनी, पाण्याच्या दुर्भिक्षामुळे चिंतेत असणारे छोटे कारखानदार यांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून निश्चितच काहीसा आश्चर्यकारक दिलासा देणारा निर्णय दादा तळमळीतून घेतात. महिला शिकून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर ती कुटुंबाला उभे करते. त्यामुळे महिला सबलीकरण हा विषय दादांच्या अजेंड्यावर आधीपासूनच आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करून दादांनी कोट्यवधी सर्वसामान्य कुटुंबांच्या अर्थचक्राला गती दिली. या लाडक्या बहिणीच्या दुवा दादांच्या यशाचे गमक ठरल्या आहेत.
राजकारण म्हणजे सत्ता, खुर्ची आणि पक्षनिष्ठा यांचा खेळ मानला जातो. पण काही नेते हे या साच्यामध्ये बसत नाहीत. ते जेव्हा एखादा निर्णय घेतात, तेव्हा त्यामागे वैयक्तिक स्वार्थ नसतो, तर जनतेच्या भल्याची तळमळ असते. अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे आपले दादा. अनेकांच्या मनात दादांनी पक्षांतर का केलं, असा प्रश्न निर्माण झाला. काहींनी टीकाही केली, काहींनी प्रश्नचिन्ह उभे केले. पण ज्यांनी ज्यांनी त्यांच्या मनात डोकावले, त्यांना त्यांच्या डोळ्यांत महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची काळजीच स्पष्ट दिसली.
दादा हे फक्त राजकारणी नाहीत, ते शेतकऱ्यांचे, तरुणांचे, कष्टकरी जनतेचे, मायभगिनींचे सच्चे प्रतिनिधी आहेत. त्यांनी पक्षापेक्षा प्राधान्य दिलं ते राज्याच्या प्रगतीला. कारण त्यांना ठाऊक होतं की, विकासासाठी निर्णायक सत्ताकेंद्रात असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच त्यांनी कठोर पण धाडसी निर्णय घेतला. जो इतिहासात ‘विकासासाठीचं पक्षांतर’ म्हणून ओळखला जाईल.
दादांनी महाराष्ट्राला नवसंजीवनी दिली. बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्प, शेतीसाठी पाणी, तरुणांसाठी रोजगार, आरोग्यासाठी आधुनिक रुग्णालयं, लाडकी बहीण योजना या साऱ्याची गती दादांनी वाढवली. प्रशासनाला गती दिली, निधीचे वाटप योग्य आणि सुरळीत पद्धतीने केले, आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर महाराष्ट्राला देशात पुढे नेले. आज जेव्हा ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात सिंचनाचं पाणी पाहतो, जेव्हा शहरातला तरुण स्टार्टअपसाठी सरकारी मदतीचा लाभ घेतो, खेडोपाड्यातल्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील चुली पेटतात, तेव्हा त्यांना जाणवतं दादांचे निर्णय किती दूरदृष्टीचे आणि दृष्टेपणाचे होते! त्यामुळे हे फक्त पक्षांतर नव्हतं, तर ते होते विकासाचे व्रत आणि राज्याच्या उभारणीसाठीची सामाजिक बांधिलकी. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेला माझ्यासारखा कार्यकर्ता ठाम आत्मविश्वासाने म्हणेल की, ‘‘दादा, तुमच्या या धाडसी निर्णयाने महाराष्ट्राची दिशा बदलली आणि प्रत्येक घरात विकासाची नवी आशा पल्लवीत झाली!’’
अजितदादा पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्वाचं प्रतीक आहे. मात्र या सशक्त व्यक्तिमत्त्वामागे एक भावनिक, समर्पित आणि कुटुंबप्रेमी माणूस उभा आहे, ज्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या घरापासून, त्यांच्या कुटुंबापासून मिळते. लहानापासूनच त्यांचं आयुष्य शिस्तबद्ध आणि मूल्यांवर आधारलेले होतं. त्यांचे काका शरदचंद्रजी पवारसाहेब हे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचंही एक दिग्गज नेतृत्व. अशा घरात वाढताना दादांनी राजकारणासोबतच कुटुंब, परंपरा आणि नात्यांचं मोल शिकून घेतलं. त्यांच्या यशामागे पत्नी सुनेत्रावहीनी यांचं मोलाचं योगदान आहे. त्या एक शांत, संयमी आणि विवेकी गृहिणी असून, घराच्या प्रत्येक जबाबदारीला अत्यंत प्रेमानं आणि दक्षतेनं निभावतात. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण दादा कधीच आपली कौटुंबिक नाती विसरले नाहीत. आई-वडिलांशी असलेली आत्मीयता, साहेबांशी असलेला आदरयुक्त स्नेहभाव, आणि बहीण, मुले, पुतणे यांच्याबद्दल असलेली आपुलकी या सगळ्यांतून एक गोष्ट ठळकपणे दिसते, ती म्हणजे कुटुंब हाच त्यांचा खरा आत्मा आहे. जेव्हा ते व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपल्या आईला भेटतात. किंवा समाजात आईचा विषय निघतो, तेव्हा त्यांच्यातील मातृप्रेमाचा ओलावा चेहऱ्यावरही दिसतो. पवार कुटुंबाची परंपरा म्हणजे एकमेकांना साथ देण्याची, संकटात खंबीर राहण्याची आणि प्रत्येक नात्याला जपण्याची. हेच संस्कार दादांनी आपल्या मुलांनाही दिले. पार्थ व जयमध्ये राजकारणातील आणि उद्योगजगतातील जी नवी ऊर्जा दिसते ती केवळ राजकीय वारसा नव्हे, तर कौटुंबिक संस्कारांचंही प्रतिबिंब आहे. दादांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. तो कुटुंबातील कर्ता माणूस म्हणून आहे, कौटुंबिक मूल्यांची ही सावली त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे, प्रत्येक कृतीमागे असते. कारण शेवटी, कुठलाही नेता मोठा होतो, तो आपल्या माणसांमुळे,आपल्या कुटुंबामुळे आणि समाजामुळे.
दादांचा राजकीय प्रवास हा सहजासहजी घडलेला नाही, तर तो कार्य, चिकाटी आणि जनतेसाठी झिजण्याच्या वृत्तीचा परिपाक आहे. आजी शारदाबाई पवार, वडील अनंतराव पवार आणि चुलते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं सार्वजनिक जीवनाचं बाळकडू घेत दादांनी पुणे जिल्हा सहकारी बॅंकेपासून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. त्यांनी १९९१ मध्ये खासदार म्हणून दिल्लीकडे झेप घेतली, परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान राज्यात अधिक प्रभावी ठरलं. काम करण्याचा वेग, आकडेवारीवर हुकूमत आणि निर्णयक्षमता या गुणांमुळे दादांनी प्रशासकीय यंत्रणेची दिशा ठरवली. ‘कामं बोलकी पाहिजेत’ या तत्त्वाचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला. दादा हे नव्या पिढीसाठी आदर्श आहेत. कामात सातत्य, लोकांशी नाळ, निर्णयक्षम नेतृत्व आणि प्रामाणिक प्रशासन या सगळ्याच अंगांनी ते उभ्या महाराष्ट्राला दिशा देतात. विद्यार्थ्यांपासून ते तरुण नेतृत्वापर्यंत सर्वांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. आजच्या धकाधकीच्या राजकारणात दादांसारखं स्थिर, समंजस आणि तरीही प्रभावी नेतृत्व महाराष्ट्राला आधार देत आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांना आणि जनतेवरील प्रेमाला कोट्यवधी महाराष्ट्रवासीयांचा पाठिंबा लाभलेला आहे. त्यामुळेच ते आज महाराष्ट्राचे जननायक ठरले आहेत. लोकांच्या मनात घर करणारा, विश्वासार्ह, आणि कार्यक्षम नेता म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे.
खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांतील मंत्रिपदे आणि महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपद भूषविण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वाला लाभला. विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्राच्या सर्वागींण प्रगतीसाठी दादा अहोरात्र झटतात. गावपातळीपासून राष्टीय स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी दादा हे एक आगळेवेगळे उर्जास्थान आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभावित होऊन अनेक युवक राजकीय क्षेत्राकडे वळले आहेत. तळागाळातील लोकांचा विचार करून अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ते योजना राबवितात व तितक्याच प्रभावीपणाने योजनांची कार्यवाहीही करतात. त्यांच्या प्रत्येक कामात त्यांची दूरदृष्टी व शिस्त यांचा प्रत्यय येतो. ‘राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य द्या’ असे ते आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतात. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी व वंचित घटकांच्या विकासासाठी ते नेहमीच कटिबद्ध असत. दादांचे निर्णय सामान्यतः तात्कालिक परिस्थितीनुसार, राज्याच्या हितासाठी आणि पक्षाच्या हितासाठी घेतले जातात. त्यांनी आपल्या नेतृत्वाच्या काळात विविध धोरणे अमलात आणली आहेत, ज्यामुळे ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकारणी म्हणून ओळखले जातात.
फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी दादा सतत प्रयत्नशील असतात. आपल्या पक्षात जातीपातीच्या व नातेसंबंधाच्या राजकारणाला ते अजिबात थारा देत नाहीत. कार्यकर्त्यांची जनमाणसाशी जोडलेली नाळ व गुणवत्ता यांना ते नेहमी प्राधान्य देतात. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष देखील तळागाळातील शेतकरी व वंचित घटकांशी जोडला गेलेला आहे. स्वार्थासाठी राजकारण व लाचारी पत्कारणाऱ्या कार्यकर्त्यांची ते कधीच भिडभाड ठेवत नाहीत. दादा हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राजकीय भाषणांमध्ये किंवा सभांमध्ये ते थेट मुद्द्यावर बोलतात. गुळमुळीत बोलण्यापेक्षा स्पष्ट भूमिका मांडणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. अनेक राजकीय चढ-उतारांमध्ये दादांनी धैर्याने व संयमाने भूमिका घेतली आहे. पक्षांतर, सत्ता परिवर्तन, आरोप-प्रत्यारोप यांच्या झळा बसूनही त्यांनी आपले राजकीय अस्तित्व ठामपणे टिकवले आहे. दादा हे राजकारणात झपाट्याने निर्णय घेणारे, प्रभावी संवाद साधणारे, कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणारे नेता आहेत. त्यांचा स्वभाव काहीसा कडक वाटू शकतो, परंतु त्यामागे कार्यप्रामाणिकता आणि लोकसेवेची तळमळ आहे. त्यांच्या नेतृत्वाची चुणूक सर्वांनाच पदोपदी पाहायला मिळते. त्यामुळेच भविष्यात दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पाहण्याची कोट्यवधी महाराष्ट्रीयांची इच्छा आहे.
थोर शिक्षणमहर्षी बाबूरावजी घोलपसाहेब आणि ज्ञानतपस्वी शारदाबाई पवार यांनी जिल्ह्यातील निरक्षर समाजाला साक्षर आणि संस्कारित करण्याच्या हेतूने १९४१ मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची ज्ञानज्योत लावली. तर आजीने लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष करण्याच्या हेतूने त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आधुनिक दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी २००६ साली दादांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील शाळांचा चेहरामोहर बदलला. गळक्या, जीर्ण वास्तू पाडून त्याजागी टोलेजंग इमारती उभारल्या. त्या इमारतीत शहरी वातावरणाप्रमाणे अत्याधुनिक सुविधाही पुरविल्या. शाळेला भौतिक वातावरण चांगले मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ताही सुधारू लागली. दादांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना समोर ठेवून अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
दादांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काम करणाऱ्यावर टाकलेला विश्वास. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा मानद सचिव म्हणून काम करीत असताना दादांनी माझ्या कामावर विश्वास टाकला. त्यांच्या या विश्वासाला पात्र ठरत आम्ही संस्था पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी गुणवत्तेसाठी अनेकविध उपक्रम सुरू केले. प्रगत मुलांसाठी गुणवत्ता वाढ वर्ग तर अप्रगतांसाठी आविष्कार गुणवर्धन उपक्रम सुरू झाला. त्यामुळे दहावी, बारावीच्या निकालाचा आलेख दरवर्षी उंचावतानाच दिसतो आहे. क्रीडाक्षेत्रात संस्थेचा विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहे. यावर्षी तर राज्यसरकारचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही दोन खेळांडूना मिळाला. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांचे संशोधन प्रकल्प जागतिक पातळीवर दर्जेदार ठरत आहेत. काही पेटंटलाही देशात मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयांचे विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा विविध क्रिडा कौशल्यात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली. नवी दिल्लीतील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांच्याकडून आकुर्डीच्या आयुर्वेद महाविद्यालयाला भारतात २२ वा तर महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळाला. १५ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले.संस्थेच्या विविध शाखांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी एकत्रित उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट सेलची स्थापना केली. काळाची पावले ओळखून विविध महाविद्यालयात नवनवीन अभ्यासक्रम सुरू झाले. आजीने लावलेल्या ज्ञानरोपट्याचा दादांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून वटवृक्ष केला आहे. प्रामाणिक आणि निःस्वार्थीपणे काम केल्याची शाबासकी कशी द्यावी, हे फक्त दादांकडूनच शिकावे. सार्वजनिक जाहीर कार्यक्रमातही चांगले काम करणाऱ्याचे ते तोंडभरून कौतुक करीत असतात. याचा मला फार जवळून अनुभव आला आहे.
आजही दादा दिवसातले अठरा तास सलग काम करतात. रात्री कितीही जागरण झाले. तर सकाळी सहा वाजता त्यांचा जनता दरबार भरलेला असतो. आळस हा शब्द त्यांच्या जीवनकोशात नाहीच. त्यामुळे त्यांच्यातला उत्साह आजही अनेकांना काम करण्यासाठी प्रेरणा देतो. त्यांच्यात कामाचा मोठा उरक आहे. कामाचा तत्काळ निपटारा करण्याची दादांसारखी हातोटी आजही अन्य कोणत्या नेत्यांमध्ये दिसत नाही. वेगवेगळ्या विभागाची मंत्रिपदे त्यांनी सांभाळली. परंतु कोणतेही काम रखडले आहे, असे कधीच झाले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊन त्याच्यात दर्जेदारपणा येईपर्यंत दादा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचे. सातत्याने गेली तीन दशके महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. सभागृहात प्रश्न मांडत असताना ज्या जनतेच्या पाठिंब्यावर आपण उभे आहोत त्या जनतेला आपण उत्तरदायी असल्याची भावना त्यांच्या उक्तीत आणि कृतीत दिसून येते.
राज्याच्या विकासाबाबत दूरदृष्टी, कुशल प्रशासक, तत्पर निर्णयक्षमता, कामाचा निपटारा आणि बदलत्या काळानुसार धोरण राबविणारा संवेदनशील नेता राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसल्यास राज्याचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही.अशा या कार्यकुशल नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


04199

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : राज आणि मी २० वर्षांनी एकत्र आलोय, हिंदी भाषिकांनाही आनंद; कोणाला पोटशूळ झालाच असेल तर... उद्धव ठाकरेंचा टोला

बॅनरवर फोटो नसल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा वाद! पालकमंत्री सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले 8 ते 10 बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडले

ENG vs IND, 4th Test: टीम इंडियात मोठा बदल! CSK च्या २४ वर्षीय गोलंदाजाची अचानक संघात एन्ट्री

Ginger Water: आल्याचे पाणी प्यायल्याने दूर होतील 'या' 5 समस्या, जाणून घ्या ते सेवन करण्याची योग्य पद्धत

Engineer Drug Dealer : सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ बनला ड्रग्ज डिलर, नशेने आयुष्याची राख रांगोळी, विमानाने दिल्ली... ट्रकने कोल्हापूर प्रवास

SCROLL FOR NEXT