पौड, ता. २३ - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (मिनी विधानसभा)च्या तारखा जाहीरही झाल्या नाहीत; परंतु मुळशी तालुक्यात निवडणुकीचे वारे तब्बल आठ वर्षांनी (२०१७ नंतर) वाहू लागले आहेत. तथापि आरक्षणाच्या कचाट्यामुळे निवडणुकीला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही; परंतु मुळशी तालुक्यात मात्र इच्छुक मंडळींनी मतदारांना प्रलोभने दाखविण्यास सुरुवात केली आहे. गेली दोन महिन्यांपासून इच्छुक आणि त्यांचे नातेवाईक पायाला भिंगरी बांधून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
मुळशी तालुक्यात गण, गटाची रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध पक्षातील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. दररोज आरामदायी जीवन जगणाऱ्यांनी यावर्षी पहाटे उठून आपल्या गणगटात समाविष्ट असलेल्या गावातील काकड्यांना हजेरी लावली. हातात टाळ घेऊन भगवंताचे नामस्मरण करत वृद्ध मतदारांशी सलगी साधत छाप पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावर्षी कधीही न डोकावणाऱ्या पुढाऱ्यांची काकड्याला अचानक गर्दी पाहून ग्रामस्थांनाही आश्चर्याचे धक्के बसत होते. गावोगावच्या काकड्यांना भेट देत अनेकांनी हजार ते लाखाच्या घरात मंदिरातच देणगी दिली. कुणी मंदिराच्या रंगरंगोटीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तर कुणी भजनाचे साहित्यही दिले. पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीला जागा घेण्यासाठीही काहींनी ५० हजार ते ५ लाखापर्यंत मदत केली. कीर्तन, प्रवचनासारखे कार्यक्रम, महोत्सव भरवून वारकऱ्यांचेही खिसे भरण्याचे काम काही करीत आहेत
महिलांची चांगलीच चंगळ
निवडणुकीच्या निमित्ताने महिलांचीही चांगलीच चंगळ होऊ लागली आहे. यावर्षी प्रत्येक गण, गटात ठिकठिकाणी होम मिनीस्टरच्या कार्यक्रमाला अगदी ऊत आला होता. महिलांना ने आण करण्यासाठी वाहनांची सोय केली गेली होती. त्याचवेळी महिलांचे मनोरंजनात्मक स्पर्धा घेऊन पैठणी, दुचाकी, टिव्ही, वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर अशा वस्तू नशीबवान महिलांना मिळाल्या. तर आलेल्या प्रत्येक महिलेला साडीही भेट दिली गेली. काहींनी जाहीर कार्यक्रम न करता थेट मतदारांच्या घरी जाऊन साड्या वाटप केले. काहींनी महिलांसाठी धार्मिक ठिकाणी सहली नेल्या. विविध पक्षांकडून महिलांसाठी कार्यक्रम घेतले गेल्याने एका एका महिलेला तीन ते चार साड्यांची ओवाळणी मिळाली. अजूनही ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करून महिलांना खूष ठेवण्याचे काम सुरू आहे.
फ्लेक्सची भाऊगर्दी
आपल्या गणगटात आपले नाव मतदारांपर्यंत पोचावे यासाठी इच्छुकांनी आपल्याच नावाचे फोटोसह फ्लेक्स जागोजागी लागले. जिल्हा परिषदेच्या उमेदवारांबरोबर पंचायत समितीच्या स्वयंघोषित उमेदवारांचे प्रत्येक गाव, वाडीवस्तीवर छोटे मोठे फ्लेक्स सध्या झळकत आहे. कुणाची सरपंच, उपसरपंच किंवा सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली, कुणाचा वाढदिवस असला तर त्यांच्याही अभिनंदन, शुभेच्छांचे फ्लेक्स इच्छुक मंडळी लावतात. दिवाळी, काकड आरती, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छांचेही फ्लेक्स सध्या गल्लीबोळात दिसत आहेत. त्यामुळे फ्लेक्सवाल्यांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.