पौड, ता. १८ : नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मुळशी तालुक्याच्या विविध गावांतील सहा जणांनी बाजी मारली आहे. त्यात नगरसेवकपदावर बाबूराव चांदेरे यांनी चौकार मारला, तर किरण दगडेपाटील, दिलीप वेडेपाटील, अल्पना वरपे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली, तसेच रूपाली पवार आणि दीपाली डोख या प्रथमच विजयी झाल्या. सहापैकी चार जण भाजपतून तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून एक जण विजयी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेतही मुळशीकरांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.
पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवा़डी, पौड फाटा, नळस्टॉप परिसरात मुळशीकर मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत, तर काही जण पुण्यातील सधन भागातही राहतात. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मुळशीच्या मातीशी नाळ गेली कित्येक पिढ्यांपासून कायम ठेवली आहे. नोकरी, व्यवसायात जम बसवून अनेक मुळशीकरांनी पुण्यात आपल्या नावाचा दबदबा तयार केला आहे. राजकीय क्षेत्रातही मुळशीकरांनी पुण्याच्या विविध भागांत स्वतःच्या नावाचे एक वलय तयार करून ठेवले आहे. पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात राहून राजकारणात ही मंडळी सक्रिय झाली. विविध पक्षांच्या मोठमोठ्या पदावर काम करीत अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सुज्ञ पुणेकरांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले. याच माध्यमातून पुण्यातील मुळशीकर महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात उतरले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत मुळशीकरांचा झेंडा फडकत असतो. याच महापालिकेतून मुठ्याचे मुरलीधर मोहोळ हे नगरसेवक, महापौर, खासदार या पदावरून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले. या उच्च पदावर पोचलेले ते पहिले मुळशीकर आहेत.
यावेळीही विजयी झालेले पाच नगरसेवक तालुक्याच्या विविध गावातील आहे. काही ठिकाणी तर एकाच प्रभागात मुळशीकर विरुद्ध मुळशीकर अशीही लढत पुणेकरांना पहावयास मिळाली. प्रभाग क्रमांक ९ मधून (सूस - बाणेर -पाषाण) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बाबूराव चांदेरे हे सूसमधील असून सलग चौथ्यांदा मतदारांनी त्यांना विजयी केले आहे. प्रभाग क्रमांक १० (बावधन - भुसारी कॉलनी) येथील भाजपचे किरण दगडे हे बावधन बुद्रुकचे आहेत. माजी सरपंच बबनराव दगडे यांचे ते पुतणे असून बावधन ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे याच प्रभागातील भाजपचे दिलीप वेडे हे बावधन खुर्दचे आहेत. या प्रभागात भाजपतून विजयी झालेल्या अल्पना गणेश वरपे या भूगावच्या माजी सरपंच विजूनाना सातपुते यांची पुतणी आहेत, तर गावच्या शिवेजवळ असलेल्या भुकूमची वरपेवाडी हे त्यांचे सासर आहे. विशेष म्हणजे या तिघांनाही दुसऱ्यांदा महापालिकेत जाण्याची संधी मिळाली आहे. याच प्रभागात भाजपत प्रथमच विजयी झालेल्या रूपाली पवार या दारवलीतील गोविंद थरकुडे यांची कन्या असून अंबडवेट गवळीवाडा येथील सचिन पवार यांच्या पत्नी आहेत. प्रभाग क्रमांक ११ मधून (रामबाग कॉलनी -शिवतीर्थनगर) काँग्रेसच्या दीपाली संतोष डोख यादेखील प्रथमच विजयी झाल्या. त्यांचे उरवडे येथील विठ्ठल शेलार यांच्या कन्या असून, त्यांचे सासर बेलावडे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.