पौड, ता. १८ : पौड (ता. मुळशी) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात झालेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारची सुट्टी असून चिमुकल्यांचे रंगकाम पाहण्यासाठी पालकमंडळी आवर्जून उपस्थित होती. यावेळी चिमुकल्या कलाकारांनी आपल्या कल्पकतेचा आणि रंगसंगतीचा आविष्कार सादर केला.
विद्यालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा पार पडली. विद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही. भोकरे, पर्यवेक्षक रमाकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांनी कोऱ्या कागदावर आपल्या कल्पकतेतून रंगसंगतीचा आविष्कार करीत वेगवेगळी चित्रे साकारली. चित्रे काढत असताना सवंगड्यांबरोबर चित्रासंबंधातील गप्पांमध्येही मुले रंगून गेली होती. कलाशिक्षक एन. पी. जगताप, उपशिक्षक बंडू दातीर, पूनम क्षीरसागर यांनी परीक्षेचे नियोजन केले होते. कलाशिक्षक जगताप यांनी फलकावर आकर्षक रंगसंगती करून सकाळ चित्रकला स्पर्धेचे चित्र रेखाटले होते.