पौड, ता. १ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पन्नास टक्के संधी दिल्याने महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कारभारणीच्या प्रचारासाठी अनेक कारभारी मताचे दान मागत फिरत आहेत. तर काही ठिकाणी श्रींच्या प्रचारासाठी सौ ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. पार्ट्यांनाही सर्वत्र रंगत आली असून हॉटेल, मंगल कार्यालये गजबजली आहेत.
मुळशीत जिल्हा परिषदेच्या तिन्ही गटांमध्ये १८ पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या पौड, माण, हिंजवडी या तीन जागांसाठी १७ महिला निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तर अंबडवेट, पिरंगुट, भूगाव या तीन जागांसाठी १५ पुरुष आणि एक महिला उमेदवार आहे. निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मतदार गाठीभेटीचा प्रचार शिगेला पोचला आहे. निम्म्यापेक्षा जास्त जागांवर महिला निवडणुका लढवीत आहेत.
आपल्याला संधी मिळाली नसली तरी पत्नीच्या प्रचारासाठी पतीदेवांची धावपळ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ठिकठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचून माझ्या पत्नीला आपले मत द्या अशी विनवणी करीत आहेत. त्यासाठी भूतकाळातले वादविवाद बाजूला ठेवून झाले गेले विसरून जाऊ असे सांगत मतदारांची गळाभेट घेऊन मताचे दान मागत आहे. पत्नीला पंचायत समिती सदस्य म्हणून पाहण्यासाठी नवरोबांची चाललेली ही धावपळ इतरांच्या नजरेतून सुटत नाही.
काही ठिकाणी पतीच्या प्रचारासाठी पत्नीदेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. गावातील महिला, नातेवाईक यांना बरोबर घेऊन सौभाग्यवती मतदारांना गाठत आहेत. त्यांना आपल्या पतीचे परिचय पत्र देवून अमुक अमुक चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या मालकाला विजयी करा असे आवाहन करीत आहे. शेताच्या बांधावर काम करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, भाजी विकणाऱ्या महिलांना गाठून या अर्धांगिनी पतीच्या विजयासाठी मताचा जोगवा मागताना दिसत आहे. पतीसाठी पत्नीच्या चाललेल्या या अट्यापिट्यावर महिलांची चर्चा चालू आहे.
उमेदवाराचे नातेवाईकही सगेसोयऱ्यांना भेटून यावेळी मत द्या, असे आवाहन करत आहेत. नात्याच्या बंधनाची गळ घालत एक एक मत मिळविण्यासाठी नातेवाइकांचा आटापिटा चालू आहे. त्यासाठी बाहेरगावी राहणारे नातेवाइकमंडळीही मतदारसंघात येत आहेत. मताविषयी शंका वाटणाऱ्या नातेवाईकाला इतरांच्या माध्यमातून गळ घातली जात आहे. मतासाठी का होइना पण बऱ्याच दिवसांनी नातेवाईकांचे पाऊल आमच्या उंबऱ्याला लागलं अशीही चर्चा जागोजागी ऐकायला मिळत आहे.
पक्षाचे कार्यकर्ते मंडळी उमेदवारांच्या प्रचारात दंग दिसत आहेत. दिवसभर उन्हातान्हात फिरून परिचय पत्रके, तसेच स्टिकर लावण्यात दंग असलेले कार्यकर्ते रात्रीच्यावेळी पार्ट्या झ़ोडत आहे. काही नातेवाईक, कार्यकर्त्यांनी कामावर रजा टाकून दिवसभर प्रचार करत आहेत. कुणी तहसिल कचेरी दररोजचा हिशोब आणि सभा, रॅलीच्या परवानगी घेण्यासाठी नियुक्त आहे. तर काही मतदारांना गाठून त्यांच्या अपेक्षांची माहिती घेवून वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्यासाठी धावपळ करीत आहे. काहींकडे प्रचारासाठी आलेल्या समर्थकांच्या जेवणाची जबाबदारी आहे. तर काही नातेवाईक उमेदवाराच्या तब्येतीची काळजी घेताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.