पौड, ता. १० : मुळशी पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहापैकी तीन जागांवर विजय मिळवला असन, दोन जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवर पक्षानेही ताकद दाखविली आहे. एक जागा खेचून घेत भाजपचीही पंचायत समितीत एंट्री झाली आहे. परंतु, शिवसेनेला मात्र भोपळाही फोडता आला नाही. मतदारांची ताकद असतानाही अपयशी ठरल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. तसेच, जिल्हा परिषदेच्या तीनपैकी दोन जागा जिंकत राष्ट्रवादीने आपली ताकद कायम राखली असून, भाजपने एका जागेवर पहिल्यांदाच कमळ फुलवले आहे.
मुळशी तालुक्यात सन २०१७मध्ये पंचायत समितीत राष्ट्रवादीला चार आणि शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीने दोन, शिवसेनेने एक जागा राखली होती. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कॉंग्रेसची कार्यकर्त्यांची फळीच भाजपात गेल्याने कमळाचीही ताकद वाढली. दोन्ही राष्ट्रवादीसह, ठाकरेसेना आणि भाजपचे तालुक्यात विविध ठिकाणी वर्चस्व होते. उमेदवारीच्या आशेने सर्वच पक्षातील इच्छूकांनी प्रलोभने दाखवून मतांची गोळाबेरीज केली. वरिष्ठांकडेही उमेदवारीसाठी फिल्डींग लावली. त्यामुळे उमेदवारीवरून घड्याळ, मशाल आणि कमळामध्येही नाराजीनाट्य झाले. आमदार झाल्यानंतर शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली पहीलीच निवडणूक असल्याने त्यांनीही ताकदीनिशी तयारी केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, ठाकरेसेना आणि भाजपनेही प्रतिष्ठा पणाला लावली. शिंदेसेनेने ही सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून नशीब आजमाविले.
दोन्ही राष्ट्रवादीत एकत्रित निवडणूकीची चर्चा निष्फळ ठरल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढती झाल्या. नाराजांना शांत करण्यास घड्याळ, मशालही यशस्वी झाले. मात्र, भाजपची माण गणात बंडाळी झाली. अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादीने दादांमुळे झालेल्या विकासकामांवर भर देत, घड्याळाचा विजय म्हणजे दादांना श्रद्धांजली, अशी ठिकठिकाणी भावनिक साद घातली. तर तुतारी, मशाल आणि कमळानेही मतदारांच्या गाठीभेटी वाढविल्या. धनशक्तीचाही जागोजागी पुरेपुर वापर झाला. इतर पक्षातील नाराजांचे खिसे गरम करून त्यांनाही वळविण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यामुळे विजयाबाबत ठोकताळे बांधण्यातही मतदारांत शेवटपर्यंत संभ्रम निर्माण राहीला.
पौड गणात राष्ट्रवादीने दोन्ही उमेदवारी धरण भागात दिली. त्यामुळे ठाकरेसेनेच्या स्वाती ढमाले, भाजपच्या पल्लवी कंधारे यांना विजयाची आशा होती. तथापि ढमाले यांच्या उमेदवारीवरून काही सेना पदाधिकारी नाराज होते. तर, उमेदवारी नाकारल्याने भाजपच्या काही निष्ठांवतांनी कंधारेंची साथ सोडली होती. जिल्हा परिषदेच्या उमेदवाराबरोबरही समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे घड्याळाने शांत डोक्याने काजल मोरे यांचा विजय साकार केला. अंबडवेट सेनेचा बालेकिल्ला होता. त्यात उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजी होती. परंतु, घड्याळाचे नवखे उमेदवार प्रविण धनवे यांनी ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्यावर मात केली. कोळवण खोरे घड्याळाच्याबरोबर राहीले. त्यामुळे इथे घड्याळाचा गजर झाला.
माण गणात भाजपला बंडखोरी भोवली. राष्ट्रवादीच्या मंदा शेळके विजयी झाल्या. भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज शेळके यांच्यापेक्षा जास्त आहे. मात्र, त्याची सल भाजपने हिंजवडी गणात भरून काढली. जिल्हा परिषदेचे शिवाजी बुचडे यांच्या साथीमुळे भाजपच्या ऐश्वर्या वाघमारे विजयी झाल्या.
अडीच गावांच्या पिरंगुट गणात तुतारीचे राहूल पवळे यांना विजयी करीत मतदारांनी पवळे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती दिली. एकाच गावात चार पक्षांचे उमेदवार उभे राहील्याने मतांचे विभाजन झाले. भूगाव गणातही तुतारीचे नवखे दगडूकाका करंजावणे यांनी बाजी मारली. भूगावमधील शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले अनिल पवार यांनी ऐनवेळी मशालीकडून उमेदवारी घेवून शेवटपर्यंत टक्कर दिली. या निवडणूकीत दोन्ही सेनेला सपशेल अपयश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.