राजेंद्र सांडभोर : सकाळ वृत्तसेवा
राजगुरुनगर, ता. २७ : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषद गटांमधून १८ उमेदवारांनी आणि पंचायत समिती गणांतून ३७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता खेड तालुक्यात आठ जिल्हा परिषद गटांमध्ये २८ उमेदवार रिंगणात राहिले असून, सोळा पंचायत समिती गणांमध्ये ६१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. माघारी नंतरची एकंदर यादी बघता खेड तालुक्यात जिल्हा परिषद गटांमध्ये जंगी लढती रंगणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
माघारीनंतर तालुक्यात महायुती आणि महाआघाडीमधील सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे, अशा तिरंगी लढती बहुतांश ठिकाणी होत आहेत.
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने ५ जिल्हा परिषद गटांत आणि १३ पंचायत समिती गणांत उमेदवार उभे केले आहेत. भाजपने ७ जिल्हा परिषद गटांत उमेदवार उभे केले होते, पण त्यांच्या ४ उमेदवारांनी पक्षाचे तिकीट असतानाही आश्चर्यकारकपणे माघार घेतली. त्यामुळे भाजप जिल्हा परिषदेच्या आता फक्त ३ जागा लढवत आहे. तसेच, भाजपने ८ पंचायत समिती गणांत उमेदवार उभे केले आहेत. त्यांपैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ते आता फक्त ५ जागा लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अवघ्या दोन पंचायत समिती गणांमधून लढत असून, काँग्रेस अवघ्या एका पंचायत समिती गणनातून निघत लढत आहे. या दोन्ही पक्षांना जिल्हा परिषदेला एकही उमेदवार उभा करता आला नाही.
तालुक्यातील सर्वात जंगी लढत पाईट- आंबेठाण गटात होत आहे. जिल्हा परिषदेत माजी कृषी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांचे गटनेते राहिलेले शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या विरोधात विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद (शिवसेना ठाकरे) उभ्या ठाकल्या आहेत. तर, स्व. माजी आमदार सुरेश गोरे यांच्या चुलत भावजय निशा राहुल गोरे या शिवसेना शिंदे पक्षाकडून रिंगणात आहेत.
दुसरी जंगी लढत कडूस चास गटात होत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख संजय घनवट यांच्या भावजय व मावळत्या जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या विरोधात पंचायत समितीचे माजी सभापती आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक अंकुश राक्षे यांच्या पत्नी वसुधा राक्षे उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्यात थेट सामना होत असून, घनवट यांची कोंडी करण्यासाठी व राक्षेंना बळ देण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवार दिला नाही, तर भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली. घनवट आणि देशमुख यांच्या दोस्ती- दुश्मनीची या लढतीला किनार आहे. घनवटांना नमवून मोहिते पाटलांनाही मागचे उट्टे काढायचे आहे. त्यामुळे इतरत्र विरोधात असणारे देशमुख व मोहिते पाटील यांचे समर्थक येथे एकत्र आले आहेत.
रेटवडी- वाफगाव गटात राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे विरुद्ध बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांच्या सूनबाई दीप्ती भोगाडे विरुद्ध राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे यांच्या पत्नी रोहिणी थिगळे असा तिरंगी सामना होत आहे. तिन्हीही उमेदवार अनेक महिन्यांपासून प्रचार आणि खर्च करत आहेत. कुरुळी- आळंदी ग्रामीण गटातून माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया मुंगसे या ठाकरे गटाकडून उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल येळवंडे या तगड्या उमेदवार उभ्या आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी या भाजपकडून मैदानात आहेत. हीही लढत लक्षवेधी ठरणार आहे.
पिंपळगावतर्फे खेड-मरकळ गटात स्वतःचे गाव नसतानाही बाजार समितीचे विद्यमान सभापती विजयसिंह शिंदे ठाकरे शिवसेनेकडून उभे आहेत. त्यांच्यासमोर जनसेवक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना शिंदे गटाचे श्रीनाथ लांडे यांनी आव्हान उभे केले आहे. लांडे यांना लोक वर्गणी गोळा करून मदत करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बलाढ्य शरद मोहिते रिंगणात उतरले आहेत.
नाणेकरवाडी- महाळुंगे या गटातून धनाढ्य उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे आहेत. ठाकरे शिवसेनेकडून जीवन खराबी, शिंदे शिवसेनेकडून गणेश नाणेकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश बोत्रे उभे आहेत. खराबी यांनी १४० कोटींची मालमत्ता असल्याचा उल्लेख उमेदवारी अर्जासोबतच्या परिशिष्टात केला आहे. तर गेल्या वर्षी प्राप्ती कराची धाड पडल्याने बोत्रे चर्चेत आले होते.
पिंपळगाव- मरकळ गटातून भाजपच्या तिकिटावर विष्णुदास ऊर्फ बापू थिटे उभे आहेत. तर त्यांच्या पत्नी चैताली विष्णुदास थिटे पिंपळगाव गणातून भाजपकडून पंचायत समिती लढवत आहेत. बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे यांनी वाडा- वाशेरे गटातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरून वेगळाच ट्विस्ट निर्माण केला आहे. मावळत्या पंचायत समिती सदस्या सुनीता सांडभोर शिंदे शिवसेनेकडून वाफगाव गणातून सर्वसाधारण जागेसाठी उभ्या आहेत, तर माजी सरपंच अनिता मांजरे रेटवडी गणातून सर्वसाधारण जागेसाठी उभ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.