सोमेश्वरनगर : निवडणुकीच्या धावपळीत राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले असून, आता सरकारस्थापनेस विलंब होत असल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. कारण, दूध उत्पादकांचे तब्बल तीन महिन्यांचे अनुदान राज्य सरकारने रखडविले आहे. अनुदान देता येत नसेल तर प्रतिलिटर पस्तीस ते चाळीस रुपये दर बांधून द्या, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
सन २०२३ मध्ये दुधाचा दर प्रतिलिटर ३८ रुपयांपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांनी गाय गोठ्यात मोठी गुंतवणूक केली होती. परंतु सन २०२४ या वर्षात मात्र दुधाचे दर घसरून त्यांची ससेहोलपट सुरू आहे. आता तर बटर व पावडरचे दर बरे असतानाही ते घसरल्याचे कारण पुढे करत दर २८ रुपये दूध दर केले आहेत. या पार्श्वभूमीवर जानेवारीत तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देऊ केले. जुलैपासून दुधाचे दर अधिकच घसरल्याने पुन्हा तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देऊ केले. ही अनुदाने मिळविता मिळविता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. निवडणुकीच्या तोंडावर १ ऑक्टोबरपासून मंत्रिमंडळाच्या समितीने ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला पायाभूत दर २८ रुपये प्रतिलिटर केला व त्यावर सात रुपये प्रतिलिटर अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र, सदर सात रुपयांतील एक पैसाही अद्याप मिळालेला नाही.
अनुदानासाठी प्रत्येक महिन्यात दहा- दहा दिवसांचे तीन मस्टर केले जातात. अद्याप ऑगस्टचेच एक दोन मस्टर बाकी आहेत. शिवाय संपूर्ण सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे तीनही महिन्यांच्या नऊ मस्टरचे अनुदान राज्य सरकारकडे देय आहे. प्रतिलिटर २८ रुपये मिळणाऱ्या दरातून काहीही शिल्लक राहात नसल्याने शेतकरी अनुदानाची वाट पाहात आहेत. निवडणुकांमुळे अनुदानास विलंब झाला आणि सरकार स्थापनेसही विलंब होत असल्याने दूध उत्पादक अस्वस्थ झाले आहेत.
नवनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष संग्राम सोरटे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना २८ रुपये प्रतिलिटर दरसुद्धा परवडत नाही. त्यांना लवकरात लवकर अनुदान जमा केले पाहिजे. शिवाय अनुदानाचा कालावधी वाढविला पाहिजे.’’ गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष रोहिदास थोपटे म्हणाले, ‘‘आमचा ऑगस्टचा एक मस्टर थकला आहे. शिवाय पुढील तीन महिन्यांचे अनुदान येणे बाकी आहे.’’ दूध उत्पादक ऋतुराज काकडे व संतोष दरेकर म्हणाले, ‘‘जाचक अटींमुळे मागील अनुदानापासून अनेक वंचित राहिले आहेत. आता अटी पूर्ण केल्या तर अकरा मस्टरचे अनुदान बाकी आहे. आताच्या दूध दरातून पेंड आणि औषधांचा खर्चही भागत नाही. त्यापेक्षा प्रतिलिटर ३५ ते ४० रुपये हमीभावच द्या.’’
दूध अनुदान व दर
जानेवारी ते मार्च- प्रतिलिटर तीन रुपये
जुलै ते सप्टेंबर- प्रतिलिटर पाच रुपये
ऑक्टोबरपासून- प्रतिलिटर सात रुपये
दूध दर- प्रतिलिटर २८ रुपये
बटरचे दर- ४०० रुपये प्रतिकिलो
पावडरचे दर- २२० रुपये प्रतिकिलो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.