संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता.३ : मागील हंगामात साखरउत्पादन घटणार असा अंदाज येताच केंद्रसरकारने निर्यातबंदी केली. आता मात्र गरजेपेक्षा खूप जास्त साखर उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाही अद्याप निर्यातबंदी उठविली गेली नाही. अतिरिक्त साखरेचे ओझे उतरविण्यासाठी किमान वीस ते तीस लाख टन साखरेची निर्यात करा, अशी मागणी सरकारकडे साखरउद्योग करीत आहे.
केंद्रसरकारने २०१८-१९ पासून २०२२-२३ या हंगामापर्यंत साखरनिर्यातीचे निर्णय घेत साखरउद्योगास हातभार लावला. गतहंगामात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखरेचा तुटवडा होऊन बाजारभाव वाढू नयेत यासाठी केंद्रसरकारने निर्यातबंदी केली. मात्र, सगळ्यांचेच अंदाज चुकले आणि तब्बल ३४१ लाख टन साखरनिर्मिती झाली. हंगामाअखेरीस साखरउद्योगाने केलेली वीस लाख टन निर्यातीची मागणी धुडकावून लावली गेली.
आता १ ऑक्टोबर २०२४ ला नवा हंगाम सुरू होतानाच तब्बल ८४ लाख टन शिल्लक साखरसाठ्याचे ओझे कारखान्यांच्या मानगुटीवर आहे. अशात चालू हंगामात ३३३ लाख टन साखरनिर्मिती होणार आहे. त्यामुळे देशाची २९० लाख टन गरज भागूनदेखील १२७ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. इथेनॉलनिर्मितीकडे ४० लाख टन साखर वळविली जाईल. यानंतरही ८७ लाख टन साखर शिल्लक राहात आहे. २०२५-२६ हंगामासाठीचा शिल्लक साखरसाठा ५०-५५ लाख टन ठेवला तरी ३२ ते ३७ लाख साखर उरते. यामुळे ''इस्मा''ने २० लाख टन निर्यातीची मागणी केली आहे.
अतिरिक्त साखरेच्या भयाने दोन महिन्यात साखरेचे दर प्रतिक्विटंल २२० रुपयांनी घसरले. एक ऑक्टोबरला ३५९० ते ३६४० रुपये प्रतिक्विंटल दर होता. एक नोव्हेंबरला ३४९० ते ३५५० रुपये प्रतिक्विंटल झाला तर १ डिसेंबरला ३३७० ते ३४२० रुपये प्रतिक्विंटलवर तीव्र घसरले. ही घसरण न थांबण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे जागतिक बाजारात ब्राझीलचे साखरउत्पादन घसरल्याने साखरेचे दर ५५० डॉलर प्रतिटनावर टिकून आहेत. कारखान्यांनी जागतिक बाजारात साखर पाठविल्यास त्यांना खर्च वजा जाता ४२००-४३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळू शकतो. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक गाडी रूळावर येण्यास मदत होईल.
अतिरिक्त साखर जास्तीत जास्त प्रमाणात इथेनॉलकडे वळविणे हाही एक मार्ग केंद्रसरकारकडे आहे. त्यात साखरेची निर्यात केल्यास अधिक चांगले होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साखरेच्या घसरणाऱ्या किमती पाहता एमएसपी निश्चित करणे अत्यावश्यक आहे.
- वीरधवल जगदाळे, संचालक, दौंड शुगर साखर कारखाना
मागील काही वर्षांतील निर्यात
वर्ष साखर (लाख टन)
२०१८-१९ - ३८
२०१९-२० - ५९
२०२०-२१ - ७०
२०२१-२२ - ११२
२०२२-२३ - ६०
२०२३-२४ - निरंक
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.