सोमेश्वरनगर, ता. ७ : सोमेश्वर कारखान्याने चालू हंगामाची पहिली उचल प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हंगाम संपताच प्रतिटन सुमारे ३५० रुपयेप्रमाणे दुसरे बिल दिले जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. ३१ डिसेंबरपर्यंतची सर्व ऊसबिले १० जानेवारीला सभासदांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहेत.
कारखान्याने ५६ दिवसांत चार लाख ७९ हजार टन गाळप करत पाच लाख २६ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. साखर उतारा ११.०५ टक्के इतका जिल्ह्यात सर्वोत्तम आहे. आजपर्यंत २ कोटी ९७ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून त्यापैकी १ कोटी ५६ लाख युनिट वीजविक्री केली आहे. डिस्टिलरीतून २३ लाख लिटर अल्कोहोल तर १४ लाख लिटर इथेनॉलची निर्मिती केली आहे. एवढे गाळप झाल्यानंतरही पहिली उचल जाहीर केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मागील हंगामाप्रमाणे तीन हजार रुपये उचलची अपेक्षा ते व्यक्त करत होते. यासंदर्भात संचालक मंडळाच्या दोन वेळा बैठका पार पडल्या. यानंतर सोमेश्वर व माळेगाव कारखान्याच्या प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नुकतीच चर्चेची फेरीही पार पडली. अखेर आज सोमेश्वरने सोलापूर जिल्ह्याप्रमाणे प्रतिटन २८०० रुपये उचलीचा ट्रेंड तयार केला आहे. यापूर्वी जिल्ह्यात श्रीनाथ व दौंड शुगर या दोन्ही खासगी कारखान्यांनी प्रतिटन २६०० रुपये उचल जाहीर केलेली आहे. अन्य कारखान्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
११७ कोटींचे बिल १० जानेवारी होणार जमा
एफआरपीच्या नव्या धोरणानुसार सोमेश्वरची पायाभूत एफआरपी (१०.२५ टक्के उताऱ्यानुसार) २६०५ रुपये असून अंतिम एफआरपी (अंतिम उताऱ्यानुसार) ३१०० ते ३१५० रुपयांच्या आसपास होणार आहे. सदर एफआरपी जिल्ह्यात सर्वाधिक असणार आहे. आर्थिक उपलब्धतेचा विचार करून पायाभूत एफआरपीमध्ये १९५ रुपयांची भर घालून प्रतिटन २८०० पहिली उचल देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. उर्वरित सुमारे ३५० रुपये हे हंगाम संपल्यावर अंतिम उतारा निश्चित होताच देण्याचा निर्णयही घेतला आहे. सध्या ३१ डिसेंबरपर्यंत तुटलेल्या ४ लाख २० हजार टन उसाच्या पहिल्या उचलीपोटी सुमारे ११७ कोटींचे बिल एकाच वेळी १० जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे, अशी माहिती पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी दिली.
७५ ते १५० रुपये अनुदान
चालू हंगामात गळीतास येणाऱ्या पूर्वहंगामी उसाला प्रतिटन ७५ रुपये तर सुरू व खोडवा उसाला प्रतिटन १५० रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तसेच दिवाळीला अंतिम बिल देणार असून राज्यातील उच्चांकी दराची परंपराही कायम राखणार आहोत, अशी ग्वाही राजेंद्र यादव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.