सोमेश्वरनगर, ता. २९ ः सहकार खात्याने केलेल्या चौकशीत मुरूम (ता. बारामती) येथील सोसायटीच्या गैर व अनियमित कारभाराचा भांडाफोड झाला आहे. सन २००९ ते २०१५ या कालावधीत कर्जावरील व्याज आकारणी चुकीची केल्याने शेतकऱ्यांना भविष्यात लाभांशापासून वंचित राहावे लागले आहे. तसेच सन २०१६ ते २०२१ या कालावधीत संस्थेने नूतनीकरण व फर्निचरचे काम करताना सरकारी व्हॅल्यूअरकडून व्हॅल्यूएशन करून न घेतल्याने संस्थेचे तब्बल २० लाख ८४ हजारांचे नुकसान झाल्याचेही उघड झाले आहे.
येथील सोसायटीच्या सन २००८ ते २०२१ कालावधीतील कारभाराची सहकार कायदा १९६०च्या कलम ८३ नुसार चौकशी झाली. प्रकाश जगताप व सुनील चव्हाण यांनी एकमेकांच्या कालावधीतील कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीनुसार बारामतीच्या सहायक निबंधकांनी अॅड. शिवदत्त मुन्तोडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. या कालावधीत माजी सचिव विठ्ठल साळुंके व जगन्नाथ मुळीक, तर विद्यमान सचिव प्रमोद जाधव यांच्याकडे कार्यभार होता.
संस्थेने चुकीच्या पद्धतीने व्याज आकारणी केल्याने लाभांश वाटपात अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. सन २००९-१० ते २०२४-१५ मध्ये विनाथकीत कर्जावरील व्याज उलटविले गेले नाही. पुढे सन २०१६ ते २०२१ या कालावधीत मात्र ते उलटविले गेले. त्यामुळे संस्थेच्या नफा- तोट्यावर परिणाम झाला आणि शेतकऱ्यांना लाभांशापासून वंचित राहावे लागले, असा गंभीर ठपका अहवालात ठेवला असून, सोसायटी तोट्यात जाण्यामागे ते महत्त्वाचे कारण आहे.
सन २०१५ ते २०२१ च्या चाचणी लेखापरीक्षणावरून संस्थेने तोट्यात असतानाही सुशोभीकरणासाठी काही गंभीर चुका केल्याचे समोर आले. फर्निचर व नूतनीकरण कामासाठी संचालक मंडळाने आर्थिक नियोजन केले नाही. जिल्हा बँकेच्या मुरूम शाखेतील ५२ लाख रुपयांच्या कायम ठेवीवर १८ लाख ६० हजार २१० रुपयांचे कर्ज उचलले. यास वार्षिक सभेत मंजुरी घेतली. मात्र, सरकारी व्हॅल्युअरकडून व्हॅल्यूएशन करून घेतले नाही. त्यामुळे अंदाजपत्रकापेक्षा दोन लाख २३ हजार खर्च जास्त झाला. संस्था निधीतूनही काही खर्च करावा लागला.
प्रत्यक्षात कार्यालयात फर्निचर दिसते आहे. मात्र, व्हॅल्यूएशन न केल्याने संस्थेचे २० लाख ८४ हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा आदेश चौकशी अधिकाऱ्यांनी बजावला आहे.
गंभीर कार्यपद्धतीबाबत निरीक्षणे
ठेवीवरील उचललेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी नफ्यातून गुंतवणूक करणे आवश्यक होते.
सन २००८ ते २०२१ कालावधीतील लेखापरीक्षण अहवालात लेखापरीक्षकांनी अप्राप्त व्याज उत्पन्नात धरले आहे व अपेक्षित उत्पन्न वाढवून दाखविले आहे.
आर्किटेक्ट व कॉन्ट्रॅक्टर या दोन्ही कामासाठी एकच ठेकेदार.
ठेकेदारासोबत स्टॅम्पऐवजी केवळ लेटरपॅडवर करार.
किमान तिघांऐवजी एकाच ठेकेदाराकडून बयाणा रक्कम घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.