सोमेश्वरनगर, ता. १४ ः करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाडी (ता. बारामती) या वस्तीवरील गंगाराम रामचंद्र कामठे हे वृत्तपत्र विक्रेते गेली १६ वर्षे सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मुसळधार पाऊस असो किंवा कडकडीत थंडी असो, कामठे यांनी वृत्तपत्र वेळेत टाकण्याची परंपरा जिकिरीने सांभाळली आहे. या व्यवसायातून त्यांच्या संसाराचा गाडा सुरळीत झाला.
सोमेश्वरनगर परिसरात वृत्तपत्र वेळेत मिळत नाही, अशा तक्रारींमुळे ‘सकाळ’ने सन २००९ मध्ये अतिरिक्त वृत्तपत्र वितरक म्हणून गंगाराम ऊर्फ दादा कामठे यांच्याकडे जबाबदारी सोपविली. अल्पावधीतच ते परिसरातील मुख्य वितरक बनले आणि ५० वृत्तपत्रांपासून केलेली सुरुवात एक हजारापर्यंत पोहोचवली.
या व्यवसायासोबतच त्यांच्याकडे स्वतःच्या दोन गाई, दोन म्हशी आहेत. वितरण झाल्यावर घरी जाऊन ते दूध धंद्याचे कामही पाहतात. पत्नी संगीता शेतीचा सर्व भार सांभाळतात. या व्यवसायाच्या बळावर त्यांना आपला संसार उभा करता आला आणि मुलांना उत्तम शिक्षण देता आले.
याआधी शेती, हुंडेकरी असे अनेक व्यवसाय केले. पण वृत्तपत्रांसोबत १६ वर्षांत संसाराचा गाडा सुरळीत झाला. मुलीला एमसीए शिकविले. ती विवाहित असून, उत्तम पद्धतीचे ब्युटी पार्लर चालविते. मुलाला बी. ई. इलेक्ट्रिकल केले. तो आता सरकारी ठेकेदार म्हणून स्थिरस्थावर झाला आहे. वृत्तपत्रामुळे चहावाल्यापासून अध्यक्षांपर्यंत अनेक माणसं जोडली गेली.
- गंगाराम कामठे, वृत्तपत्र विक्रेते
04998