सोमेश्वरनगर, ता. २५ : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाच्या पहिल्या हप्त्याची कोंडी जिल्ह्यात सर्वप्रथम फोडली आहे. एकरकमी एफआरपीपेक्षा १५ रुपये प्रतिटन अधिकचे देत एकूण ३३०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाने मंगळवारी (ता. २५) घेतला. ‘सोमेश्वर’च्या आणि जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वाधिक पहिली उचल ठरणार आहे.
राज्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनांमुळे एकरकमी एफआरपीच्या सूत्रानुसार साडेतीन हजार रुपये प्रतिटनांच्या आसपास पहिली उचल दिली जात आहे. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात मात्र ऊसदराची कोंडी फुटत नव्हती. पुणे जिल्ह्यातही हंगाम सुरू होऊन पंचवीस दिवस झाले तरी कारखाने आणि शेतकरी संघटनाही मौनात होत्या. अखेर ‘सोमेश्वर’ने ही कोंडी फोडली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने एकरकमी ३३०० रुपयांप्रमाणे पहिली उचल अदा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
‘सोमेश्वर’ने गतहंगामात सर्वाधिक उतारा प्राप्त केल्याने जिल्ह्यात ३२८५ रुपये प्रतिटन इतकी सर्वाधिक एफआरपी आहे. सदर एफआरपी एकरकमी मिळणार की एफआरपीचे दोन टप्पे केले जाणार, याची चर्चा होती. कारखान्याने एफआरपीपेक्षा पंधरा रुपये अधिकचे दिले आहेत. दोन- तीन दिवसांत १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तुटलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
बँकेकडून साखरेवर २८९० रुपये प्रतिक्विंटल उचल मिळत आहे. मागचे तारण कर्ज ‘निल’ झाले असून, शिल्लक साखरेचे पैसे सुरवातीला उपलब्ध होतील. बगॅस विक्रीही सध्या चालू आहे. डिसेंबरपासून इथेनॉल, जानेवारीपासून वीजनिर्मितीचे पैसे उपलब्ध होतील. कारखान्याचा ताळेबंद स्वच्छ आहे. त्यामुळे मोठी उचल देता येणार आहे, अशी माहिती पुरुषोत्तम जगताप व राजेंद्र यादव यांनी दिली.
‘अंतिम ऊसदरही उच्चांकी देणार’
सभासदांचा व संचालक मंडळाचा पाठिंबा, अजितदादांचे मार्गदर्शन, कामगार- अधिकारी, वाहतूकदार-तोडणी कामगार यांच्या सहकार्याने चालू हंगामाचे चोख नियोजन केले असून, १४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत आणि अंतिम ऊसदरही उच्चांकी देण्याची परंपरा राखणार आहोत. तसेच, फेब्रुवारीत तुटणाऱ्या उसाला १०० रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला २०० रुपये, तर एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला ३०० रुपये प्रतिटन अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सोमेश्वर’लाच ऊस घालावा, असे आवाहन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.