सोमेश्वरनगर, ता. ५ ः वाणेवाडी (ता. बारामती) येथील तुळशीराम जयसिंग कोंडे (वय ६७) या ज्येष्ठावर औंध जिल्हा रुग्णालयात रोबोटिक पद्धतीने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयात पार पडलेली ही राज्यातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया आहे. यानिमित्ताने राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
येथील तुळशीराम कोंडे हे ज्येष्ठ व्यक्ती मागील सहा- सात वर्षांपासून उजव्या पायाच्या गुडघेदुखीने बेजार होते. स्थानिक पातळीवर सर्व प्रकारचे उपचार करून पाहिले मात्र, शस्त्रक्रियेशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट झाले. खासगी यंत्रणेकडे शस्त्रक्रिया करणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे ठरणार असल्याने सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यामार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्याकडे हा विषय गेला. डॉ. खोमणे यांच्या पुढाकाराने कोंडे यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
औंध जिल्हा रुग्णालयात पुणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या नेतृत्वाखाली दीड तास ही रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये डॉ. अनिल बिहाडे, डॉ. अनिल संतपुरे, डॉ. महेंद्र गरड, डॉ. अंमित बनशेळकीकर यांचा समावेश होता. तर भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. केशव गुट्टे, डॉ. बालाजी कदम, डॉ. शोएब शेख, डॉ. जयश्री मन्नूर, डॉ. प्राची उत्तरवार यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. मनोज खोमणे हेही उपस्थित होते. सरकारी आरोग्य यंत्रणा आधुनिक होत असल्याचे हे द्योतक असून, यात प्रगती झाल्यास गोरगरीब रुग्णांचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.
यावेळी डॉ. खोमणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील कुठल्याही सरकारी रूग्णालयातील ही पहिलीच रोबोटिक शस्त्रक्रिया आहे, तर सिव्हिल रुग्णालयापैकी राज्यातील पहिली आहे.’’
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते. ही हाडाच्या रुग्णांसाठी अत्यंत क्रांतिकारक पद्धती ठरणार आहे. खासगी दवाखान्यांमध्ये तिचा वापर होऊ लागला आहे. आता सरकारच्या राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये प्रथमच औंध जिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा वापर करण्यात आला. यामुळे शस्त्रक्रिया अचूक होते आणि सुधारणा लवकर होते.
- डॉ. अनिल बिहाडे
दोन्ही गुडघे दुखत होते. मात्र, उजव्या गुडघ्याचे दुखणे तीव्र झाल्याने शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. रोबोटिक शस्त्रक्रिया चांगली आणि सुरक्षित आहे. महात्मा फुले योजनेतून मदत मिळाली. कुठलाही खर्च आला नाही. सध्या रुग्णालयात असून, एक- दोन दिवसात डिस्चार्ज देतील.
- शेखर तुळशीराम कोंडे, शस्त्रक्रिया झालेले ज्येष्ठाचा मुलगा
05140