सोमेश्वरनगर, ता. ६ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन हंगामात विलंब कालावधीत दिलेल्या एफआरपीचे एक कोटी २९ लाख रुपये व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. एफआरपीपेक्षा अंतिम दर अधिक दिलेला असतानाही विलंब कालावधीचे व्याज देणारा सोमेश्वर बहुधा राज्यातील एकमेव असावा, असा दावाही त्यांनी केला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात एफआरपी (उसाची रास्त व उचित किंमत) द्यावी अन्यथा विलंब झाल्यास विलंब कालावधीचे पंधरा टक्के व्याज शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असते. यानुसार शेतकऱ्यांना मागील तीन हंगामाचे प्रलंबित व्याज अदा करण्याचा निर्णय सोमेश्वरच्या संचालक मंडळाने २५ नोव्हेंबरच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्या.
‘सोमेश्वर’ने यापूर्वी २०२१-२२ या हंगामात एफआरपीस विलंब झाल्याने त्यापोटी एक कोटी १० लाख रुपये व्याज २०२२-२३ हंगामात शेतकऱ्यांना अदा केले होते. यानंतर सन २०२२-२३ चे २३ लाख ९० हजार, २०२३-२४ चे ४० लाख ६८ हजार तर २०२४-२५ चे ६४ लाख ५८ हजार असे एकूण एक कोटी २९ लाख रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.
चालू हंगामातही सर्वोच्च ऊसदर
चालू हंगामात एकरकमी एफआरपीच्या नियमानुसार सोमेश्वरची ३२८५ रुपये प्रतिटन इतकी एफआरपी असून ‘सोमेश्वर’ने ३३०० रुपये प्रतिटन इतकी जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वोच्च उचल दिली आहे. एक ते १५ नोव्हेंबर कालावधीत गळीतास आलेल्या उसाची एफआरपी सभासदांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. गेले सलग नऊ हंगाम एफआरपीपेक्षा अधिक अंतिम दर ‘सोमेश्वर’ने दिला असून चालू हंगामातही सर्वोच्च ऊसदर देणार असल्याची ग्वाही पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
कारखान्याने दिलेला अंतिम दर व एफआरपीपेक्षा जादा दिलेली रक्कम (प्रतिटन रुपयांत)
वर्ष अंतिम दर एफआरपीपेक्षा जादा एकूण जादा रक्कम
२०२१-२२ ३०२० २१८ २८ कोटी ९४ लाख
२०२२-२३ ३३५० ४९९ ६२ कोटी ७७ लाख
२०२३-२४ ३५७१ ६९७ १०२ कोटी ११ लाख
२०२४-२५ ३४०० २२६ २५ कोटी २३ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.