संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २७ : पुणे जिल्हा परिषदेवर एकहाती वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे यापूर्वी खिजगणतीतही नसलेल्या भाजपने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र अर्जमाघारीनंतर स्पष्ट झाले आहे. घड्याळाला तुतारीची साथ मिळाल्याने आजघडीला कागदावर राष्ट्रवादी मजबूत दिसत आहे, मात्र उमेदवारीवाटपाचा गोंधळ, स्थानिक पातळ्यांवरील तुंबळ वाद-विवाद आणि अनेकरंगी लढती यामुळे राष्ट्रवादीला सत्तेच्या पुनर्स्थापनेसाठी अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे.
जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीकडे दोन खासदार, सात आमदार व सतरापैकी दहा नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यात ‘घड्याळा’चाच गजर आहे. मात्र, पुणे व पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागल्याने जिल्हा परिषद निवडणुका ही राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. हे जाणूनच अजित पवार आपल्या सोंगट्या काळजीपूर्वक हलवत आहेत. काही चाली यशस्वी ठरत आहेत, तर काही ठिकाणी तुतारीच्या इच्छुकांचा हिरमोड आणि बंडखोरीचेही चित्र आहे.
बारामती व इंदापूर या होमग्राऊंडवरील चौदा जागांवर राष्ट्रवादीस फारशी चिंतेची परिस्थिती नाही. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि बारामतीत अभिजित देवकाते यांचे उमेदवार थेट ‘घड्याळा’वर देऊन अजित पवार निर्णायक चाली खेळले आहेत. घड्याळाला फक्त राष्ट्रवादीतूनच भाजपत गेलेल्या प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांचे आव्हान आहे.
पुरंदरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. मागील वेळी चारपैकी शून्य जागा होत्या हा इतिहास निश्चित बदलणार का, हे पाहवे लागणार आहे. पण, राष्ट्रवादीचे कैलास इंगळे भाजपत, तर दत्ता झुरंगे काँग्रेसकडे गेल्याचा फटकाही बसणार आहे. होमग्राऊंडवरील दौंडमध्ये मात्र राष्ट्रवादीला तुल्यबळ भाजपसोबत घासून लढत करावी लागत आहे. राष्ट्रवादीच्या अप्पासाहेब पवारांना भाजपने उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीच्या योगिनी देवकर, अजित शितोळे यांनी वेगळी चूल मांडली आहे.
आमदारकी आणि नगरपालिकेचे सभापतिपद मिळविल्याने भोर, राजगड, मुळशीमध्ये राष्ट्रवादीचा उत्साह दुणावला आहे. मात्र उमेदवारीवरून झालेली नाराजी आणि अपक्षांची बंडखोरी राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरू शकते.
खेड आणि जुन्नर या प्रत्येकी आठ जागा असणारे तालुके राष्ट्रवादीला बहुमतासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. खेडमध्ये शरद बुट्टे पाटलांना स्वगृही आणण्याची चाल अजित पवार खेळले असून, तिथल्या आठ जागांवर राष्ट्रवादीविरोधात भाजप, शिंदे सेना यांनी कंबर कसल्याने चुरस आहे. जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा बेनके- कोल्हे यांनी घडवून आणलेला एकोपा भाजप व शिंदेसेनेला कितपत भारी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, तिथेही काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेनेस (उबाठा) एक जागा देऊन पवार बेरजेचे राजकारण खेळले आहेत.
हवेलीच्या सहा जागांवर कागदावर मोठ्या दिसत असलेल्या राष्ट्रवादीला थेट भाजपने आव्हान दिलेले आहे. उरुळी गटात राष्ट्रवादीच्या जितेंद्र बडेकर यांच्याविरोधात भाजपने राष्ट्रवादीच्याच शंकर बडेकर यांना कमळावर उमेदवारी दिली आहे. तर मावळातही पुन्हा घड्याळाला कमळाचेच आव्हान आहे.
शिरूर-आंबेगावला मने जुळणार?
तुतारी-घड्याळाच्या एकोप्यानंतर कागदावर राष्ट्रवादी बलवान असलेल्या शिरूर-आंबेगाव तालुक्यात गोटात मात्र गोंधळाची स्थिती आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची तसेच माऊली-बापूंची मने जुळणार का यावरच यश मोठे मिळणार की छोटे, हे अवलंबून आहे. नेता राष्ट्रवादीत आणि नातेवाईक अन्य पक्षात असेही काही ठिकाणी चित्र आहे. भाजप-शिवसेनेला यामुळे आयती कुमक मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.