सोमेश्वरनगर, ता. २७ : सध्याच्या केंद्र सरकारच्या ई-२० धोरणानुसार पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचा टप्पा मागील आणि चालू हंगामात डिस्टिलरी प्रकल्पांनी गाठला आहे. मात्र, झपाट्याने डिस्टिलरींमध्ये वाढ झाली असल्याने २० टक्के मिश्रण करूनही जवळपास निम्मे इथेनॉल शिल्लक राहिले. अतिरिक्त इथेनॉलसाठी आता केंद्र सरकारने ई-३० धोरणाच्या दिशेने पावले टाकणे आवश्यक आहे अन्यथा उद्योग मोडून पडण्याची भीती आहे.
पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रण करण्यासाठी ई-२० धोरण केंद्र सरकारने राबविले. २०१४ मध्ये एवढे १.४० टक्के मिश्रण झाले होते. प्रदूषणाच्या भीषण समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने पर्यावरणपूरक इथेनॉल इंधनास प्रोत्साहन दिले. व्याजसवलत दिली, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) घटविला. कारखान्यांनाही साखरेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारवर विश्वास ठेवून इथेनॉलमागे मर्यादेपलीकडे धावले. त्यामुळे मुदतीआधीच २०२४-२५ मध्ये ई-२० गाठले आणि आताच्या २०२५-२६ हंगामातही निश्चित आहे. उलट चालू हंगामात पेट्रोल कंपन्यांकडे डिस्टिलरींनी तब्बल १७७६ कोटी लिटरच्या निविदा भरल्या. कंपन्यांनी १०४८ कोटी लिटरच्याच निविदा मंजूर केल्या. ई-२० नुसार इथेनॉलची देशाची गरज ११०० कोटी लिटर आहे आणि सध्या उत्पादन १८०० कोटी लिटर आहे. उभारणीच्या अवस्थेतील ३३ प्रकल्प पूर्ण झाल्यावर २००० ते २१०० कोटी लिटर उत्पादन होणार आहे. त्यात साखर उद्योगास धान्यावर आधारित इथेनॉलला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ई-३० धोरणाशिवाय पर्याय नाही. तेवढे इथेनॉल पुरवू शकतात. किंवा डिझेलमध्ये मिश्रणाचा किंवा ई-१०० वाहन निर्मितीचा सरकारचा विचार प्रत्यक्षात उतरायला हवा. अन्यथा मोठा घास घेऊन बसलेल्या डिस्टिलरी आणि कारखाने उत्पादनच घेता न आल्याने मोडीत निघायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. साखरेचे दर सरकार वाढू देत नाही, विजेला पुरेसे पैसे मिळत नाहीत आणि इथेनॉलवर घाला बसला तर एफआरपी देणेही कठीण होणार आहे. चालू हंगामातील साडेचार हजार कोटींच्या एफआरपीच्या थकबाकीवरून हे थेट निदर्शनास आलेलेच आहे.
इथेनॉल मिश्रणावर चालतील अशा वाहनांच्या संशोधनावर भर दिला पाहिजे. तसेच आयसोब्युटेनॉल आणि फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तोपर्यंत नव्या मंजुऱ्या विचारपूर्वक द्यायला हव्यात.
- वीरधवल जगदाळे, मुख्य संचालक, दौंड शुगर
आवश्यक उपाययोजना
पेट्रोलमध्ये पंचवीस टक्के व त्यानंतर तीस टक्के इथेनॉल मिश्रणाची गरज
फ्लेक्सफ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज
डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी संशोधन आणि प्रयत्न आवश्यक
इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे इथेनॉलवरील वाहनांना करसवलती आवश्यक
नवे परवाने देताना धोरणमर्यादेचा विचार करणे
इथेनॉल मिश्रणाबाबतच्या गैरसमजांना शास्त्रीय उत्तरे देणे
इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या किमती कमी करणे
आकडेवारी
देशात डिस्टिलरी : ३८०
नव्याने उभारणी सुरू : ३३
एकूण इथेनॉल उत्पादन : १८००-१९०० कोटी लिटर
सध्या इथेनॉलची गरज : ११०० कोटी लिटर