सोमेश्वरनगर, ता. ३ ः ‘‘सलग सात-आठ वर्षे सीएच्या ध्येयापासून विचलित न होता अभ्यासात सातत्य ठेवले. दैनंदिन जीवनातही शिस्त ठेवली. सोशल मिडिया, ओटीटीपासून दूर राहिले. कुटुंबाचा, गुरुजनांचा प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळाला. म्हणूनच जे नववीत करायचे ठरवले होते ते स्वप्न आज साकार झाले. अखेर मी ‘सीए’ झाले...! अशा शब्दांत तरडोली (ता. बारामती) येथील अबोली संगीता हनुमंत भापकर हिने आपल्या यशाचे रहस्य उलगडले.
सन २०१८पासून जानेवारी २०२६पर्यंत अभ्यासात सातत्य ठेवत अबोलीने ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया’तर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेद्वारे सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौंटंट) या पदाला गवसणी घातली आहे. जिरायती भागातल्या शेतकरी कुटुंबातील अबोलीच्या यशाने मोरगाव परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
अबोली तरडोलीच्या जिल्हा परिषद शाळेत असतानाच प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यपातळीवर चमकली होती. मोरगावच्या ‘रयत’च्या मयुरेश्वर विद्यालयातील शिक्षकांनी तिला स्पर्धा परीक्षेचे स्वप्न दाखविले. नववीत असताना ‘सकाळ’ प्रकाशनाचे स्पर्धा परीक्षांबाबतचे पुस्तक वाचनात आले आणि गणिती क्रियांमध्ये रस असल्याने तिने सीए करायचे ठरवले. त्यासाठीच उच्च माध्यमिक शिक्षण थेट पुण्यातील हुजुरपागामध्ये वाणिज्य शाखेतून घेतले आणि बारावीत पहिली आली. पुढे गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी घेतली. बारावीनंतर २०१८पासूनच ‘सीएसीपीटी’ परीक्षा देऊन इंटरमिजिएट या टप्प्याची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यात यश आले.
‘सीए फायनल’ या टप्प्यावर पहिल्या ग्रुपची परीक्षा मे-२०२५ मध्ये देऊन यश मिळविले. मात्र दुसऱ्या ग्रुपच्या सप्टेंबर २०२५च्या परीक्षेत थोडक्यात यश हुकले. मात्र अपयशाने विचलित न होता तिने अखेर जानेवारी २०२६मध्ये झालेल्या अंतिम परिक्षेत यश मिळविले. दरम्यान शेवटची तीन वर्षे आर्टीकलशिप करत असताना तिने एलएलबी ही कायद्याची पदवीदेखील संपादन केली आहे. शेतकरी हनुमंत भापकर आणि सकाळच्या प्रतिनिधी संगीता भापकर यांची ती कन्या आहे.
...तर डायरेक्ट मला फोन कर
अबोलीने सीएची तयारी सुरू केल्यावर २०१९मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात तिला बोलवून घेत मार्गदर्शन कुठे घेते?, अभ्यास कसा करते?, वेळेचे नियोजन आणि शिस्त कशी पाळते? अशी बारकाईने चौकशी केली. तसेच ‘माझा नंबर घे आणि कुठेही मदत लागली तर डायरेक्ट मला फोन कर’ असे सांगितले होते. आज सीए झाल्याचा फोन दादांना करायचा होता... पण ते आज नाहीत. परंतु त्यांचे आधाराचे शब्द कायम स्मरणात राहतील, असा अनुभव भावनिक झालेल्या अबोली भापकर हिने सांगितला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.