सोमेश्वरनगर, ता. २२ : पुस्तकांपासून माणसं दुरावत चालल्याची खंत असताना लपतळवाडी (ता. पुरंदर) येथील प्रा. कुंडलिक कदम या शिक्षकाने केवळ वाचकांनाच नव्हे तर लेखकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. पाच वर्षांत त्यांनी नवोदित लेखकांच्या २६७ पुस्तकांचे परिचय लिहून त्यांनी पुस्तकांचा आशय वाचकांपर्यंत पोहोचविला आहे.
नवोदित लेखकांनी आगामी काळातही लिहिते राहण्यासाठी ते सातत्याने उपक्रम राबवीत आहेत. केवळ परिचयच नाही तर विविध कार्यक्रमात त्यांनी पुस्तक स्वरूपात भेट देण्याचा पायंडा पाडला आहे. अशी त्यांनी आत्तापर्यंत विविध लेखकांची दोन हजार पुस्तके समारंभाच्या माध्यमातून भेट दिली आहेत. याशिवाय ते दहा वर्षे झाले शेतकरी आणि कामगार या घटकातील उत्तम वाचकांचा सन्मानही करत आहेत.
प्रा. कदम हे तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेत वाणिज्य विभागाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘आपण ज्ञान प्राप्त केले तरच ते विद्यार्थ्यांना देऊ शकतो.’’ या विचारातून त्यांनी वाचनाचा छंद जोपासला आहे. कोरोनाच्याकाळात वाचन करताना ते समाजमाध्यमातील ‘वाचन साखळी’ या वाचनचळवळ वाढविणाऱ्या अठरा हजार जणांच्या गटाशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी नव्या दमाच्या लेखक-कवींच्या पुस्तकांची समीक्षा करत, पुस्तक परिचय राज्यभर पोहोचविण्याचे काम सुरू केले. वाचक-लेखकांचा प्रतिसाद बघून त्यांचा उत्साह वाढला. हा उपक्रम पुढे सुरू ठेवत विविध साहित्यप्रकारातील पुस्तकांचे परिक्षण त्यांनी केले आणि ही पुस्तके त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. वाचनसाखळी परिवाराच्या परंपरेप्रमाणे शंभर पुस्तकांच्या परिचयानंतर ‘वाचनयात्री’ तर दोनशे पुस्तकांचा परिचय लिहिल्यानंतर ‘वाचनश्री’ हे पुरस्कार कदम यांना प्रदान करण्यात आले. मोबाइलच्या संस्कृतीमध्येही वाचनाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न वाचनसाखळी समूहाच्या प्रेरणेतून केले जात आहेत. या उपक्रमातून प्रा. कदम यांनी ‘शिदोरी’, ‘समासातल्या नोंदी’ हे ललितसंग्रह तर ‘लग्नाचा बार’ हे पुस्तक लिहिले आहे. याशिवाय अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिण्याची संधी त्यांना मिळाली असून शिरूर महाराष्ट्र साहित्य परिषदेत पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
एक हजारांहून अधिक कात्रणांचा संग्रह
प्रा. कुंडलिक कदम हे पुस्तक दिनानिमित्त दरवर्षी व्यावसायिक, शेतकरी, कामगार, शेतमजूर या घटकांतील वाचकांचा कार्यस्थळी जाऊन सन्मान करतात. ‘सकाळ’मधील वेगवेगळ्या वैचारिक, सामाजिक सदरांच्या एक हजारांहून अधिक कात्रणांचा संग्रह त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.