शैक्षणिक-आध्यात्मिक संगम
पुणे-मुंबई दरम्यान सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या गावांपैकी एक असलेल्या शिरगावाने आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. प्रकल्प, मंदिरे, आधुनिक शिक्षणसंस्था आणि नवनवीन विकासयोजनांमुळे ‘प्रतिशिर्डी’ म्हणून ओळख मिळालेले शिरगाव आज जागतिक स्तरावर उन्नती साधण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.
- बी. आर. पाटील, शिरगाव
शि रगाव जितके आध्यात्मिक आहे, तितकेच सामाजिक आणि शैक्षणिक विकासाच्या बाबतीत जगाशी आपले घट्ट नाते सांगणारे आहे. दिवसेंदिवस व्यापक, उत्क्रांत आणि आधुनिक होत चाललेले शिरगाव पुणे आणि मुंबई यांच्या दरम्यान सर्वात जलदगतीने वाढणाऱ्या परिसरांपैकी एक म्हणून ओळखले जात आहे. शिरगावला जसा आध्यात्मिकतेचा वारसा लाभला आहे, तसाच शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचा ही परिसस्पर्श मिळाला आहे. हे गाव जर अशाच वेगाने वाढत राहिले, तर भविष्यात येथे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभे राहतील, यात शंका नाही.
साईबाबांमुळे ओळख
शिरगावमध्ये गेल्या काही वर्षांत राजाधिराज साईबाबांनी शिर्डीचे वैभव घेऊन जणू स्वतः अवतीर्ण झाल्यासारखे भव्य मंदिर उभे राहिले. तेव्हापासून सामाजिक विकासाच्या बाबतीत शिरगाव मागे वळून पाहायला तयार नाही. दिवंगत माजी आमदार प्रकाश देवळे यांनी या जगप्रसिद्ध साईमंदिराची उभारणी केली आणि त्यामुळे शिरगावचे ‘प्रतिशिर्डी’ असे नामकरण झाले. आज शिरगावपेक्षा प्रतिशिर्डी हे नाव अधिक ओळखले जाते, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. जणू या मातीतच बाबांचा आशीर्वाद लाभला असून, ही माती वरदान लाभलेली आहे, असे भक्तांना वाटते.
अष्टविनायकाचे मंदिर
साईबाबा मंदिरापासून थोड्याच अंतरावर प्रसिद्ध उद्योजक बिर्ला समूह अष्टविनायकांचे भव्य मंदिर उभारण्याचे काम मोठ्या वेगाने करत आहे. याचे बांधकाम गेली दोन वर्षे रात्रंदिवस सुरू असून, लवकरच हे मंदिर शिरगावच्या सौंदर्यात भर घालणार आहे. शिरगावमध्ये बी. के. बिर्ला यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल उभे असून, त्याची ख्याती संपूर्ण भारतभर पसरली आहे. राज्यातील अनेक लोकप्रिय आमदार, खासदार, मंत्री, तसेच खेळाडू येथे शिक्षण घेऊन पुढे नाव कमावत आहेत. शिवाय शारदाश्रम आश्रमशाळा समाजातील दीनदुबळ्या, अनाथ, वंचित आणि गरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. याच शाळेच्या माध्यमातून चांगले निकाल लागत असून, भविष्यात येथे पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करण्याची योजना आखली जात आहे. ही योजना यशस्वी झाली तर शिरगाव आणि परिसरातील आठ ते दहा गावांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचेल, यात शंका नाही. या शाळेत सुमारे पाच-सहा गावांतील विद्यार्थी आपल्या भविष्याला आकार देत आहेत.
परिसराचा कायापालट
शिरगावमध्ये अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांनी महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाची उभारणी केली आहे. त्यामुळे जणू एक नवे शिरगावच आकार घेत आहे. बहुतेक सदनिका पूर्णत्वास आल्या असून, नव्याने वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिरगावच्या अगदी शेजारीच देशात प्रसिद्ध असा पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग असल्याने गावाला नवी ओळख मिळाली आहे. आधी अत्यंत बिकट अवस्थेत असलेला शिरगाव-गहुंजे रस्ता आज पूर्णपणे बदललेला दिसतो. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर जाण्यासही भीती वाटत असे; आज मात्र शहरात आल्यासारखी अनुभूती होते. हा विकास किती अल्पावधीत झाला याचा विश्वास बसत नाही. याच रस्त्याच्या कडेने उभे असलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम शिरगावची ओळख अजूनच उजळवते. नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषकातील काही सामनेही याच मैदानावर खेळविण्यात आले, हे विशेष.
ग्रामपंचायतीचाही सक्षम कारभार
सोमाटणे-कासारसाई रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शिरगावच्या प्रगतीला नवीन बळ मिळेल. ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या योजना
राबविल्या असून, आणखी काही योजना मार्गी लागत आहेत. त्या पूर्णत्वास गेल्या की शिरगावच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. सध्या सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या अनेक लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे निकट भविष्यात शिरगाव हे शैक्षणिक आणि आध्यात्मिक राजधानीसारखे भासू लागेल, यात दुमत नाही.
००५९१, ००५९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.