सुपे, ता. २७ ः काऱ्हाटी (ता. बारामती) येथे सोमवारी (ता. २६) झालेल्या ग्रामसभेत आधी मागील सभेचे इतिवृत्त वाचा मग पुढील विषयावर चर्चा करू या मुद्द्यावरून गोंधळ झाला.
ग्रामपंचायत अधिकाऱ्याने मागील इतिवृत्त माझ्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमधील कपाट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील केले. येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामसभेसाठी सकाळी दहापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच दीपाली लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली. ग्रामपंचायत अधिकारी रजेवर गेल्याने बदली ग्रामपंचायत अधिकारी मधुकर खोमणे उपस्थित होते. विषय वाचणास सुरुवात झाल्यानंतर आधी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करा, असा मुद्दा उपस्थित ग्रामस्थांनी लावून धरला. मागील सभेचे इतिवृत्त माझ्याकडे उपलब्ध नाही, अशी माहिती खोमणे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले. इतिवृत्त उपलब्ध नाही, तर मग सभाच कशाला घ्यायची? असा पवित्रा काही ग्रामस्थांनी घेतला. या वादळी ग्रामसभेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचली. दरम्यान, बारामती तालुका पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे व अन्य अधिकारी सभास्थळी आले. सुपे पोलिस ठाण्याच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर अखेर ग्रामपंचायत कार्यालयातील कपाट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी गावातील विविध विकास कामांविषयी मुद्दे मांडले. साठेनगर, रोहिदासनगर, भीमनगर भागात विकास कामे झाली नाहीत, गावात जी कामे झाली ती निकृष्ट झाली, १५ टक्के निधीतून खर्च झाला नाही, घरकुले दिली नाहीत, नळपाणी पुरवठा योजनेद्वारे आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी मांडली. कोरम अभावी ग्रामसभा तहकूब होतात. गावाला दीड कोटींचे बक्षीस मिळाले. त्याचा विनियोग कसा केला, त्याची माहिती मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गावात सध्या चार दिवसांनी रोटेशन पद्धतीने नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. वीज खंडित झाली तर एखादा दिवस वाढतो. घरकुल मंजूर असणाऱ्यांना स्वमालकीची जागा नसल्याने घरकुलांची कामे झाली नाहीत. ग्रामसभेला कोरम पूर्ण होत नसल्याने सभा तहकूब होतात. सोमवारी (ता. ९) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
- दीपाली लोणकर, सरपंच, काऱ्हाटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.