शिरूर, ता. १६ : वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ओजस शाळेसाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या जमीनी दिल्या, गावच्या यात्रेतील तमाशे बंद करून त्या पैशांतून शाळा उभी केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी १६ अधिकचे खासगी शिक्षक नेमून त्यांच्या पगाराचा खर्च पालकांच्या संमतीने करून त्याचा हिशेब जगजाहीर केला. आमदार अशोक पवार यांच्याआडून वाबळेवाडी शाळेवर व ग्रामस्थांवर बेछूट आरोप करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे व पूजा भुजबळ यांनी प्रथम शहानिशा करावी व मगच पोपटपंची करावी, असे आवाहन वाबळेवाडी शाळेचे मार्गदर्शक सतीश वाबळे व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या भारती वाबळे यांनी दिले. याबाबत कुणाशीही समोरासमोर चर्चेची ग्रामस्थांची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाबळेवाडी शाळेकडून शुल्क आकारल्याच्या पावत्या दाखवून विश्वास ढमढेरे यांनी शालेय कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याला पूजा भुजबळ यांनीही समर्थन दिल्याने आज वाबळेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत प्रत्यूत्तर दिले.
सतीश वाबळे म्हणाले, ‘‘ढमढेरे व भुजबळ यांच्या प्रश्नांना शासनाच्या चौकशी समितीने यापूर्वीच उत्तर दिले असून, शाळेला क्लिनचीट मिळाली आहे. एकट्या दिलीप वाबळे यांना आपल्या बाजूला वळवत त्यांना शाळा व ग्रामस्थांविरोधात बोलायला लावताना त्यांची मानसिक स्थिती तपासली का? दिलीप वाबळे हे सैन्यदलात होते, तेथून त्यांना घरी का पाठविले याचीही माहिती घ्या.’’
भारती वाबळे म्हणाल्या, ‘‘शाळेच्या तक्रारी याव्यात म्हणून चुचकारून, दमदाटी करून पाहिले. पण कुणीही पुढे न आल्याने अमित राऊत या कंत्राटदाराला हाताशी धरून तक्रारदार म्हणून शाळेत पाठविले आणि शाळेची बदनामी केल्याचे विश्वास ढमढेरे व पूजा भुजबळ यांना माहिती नाही का?’’
क्लीन चीटचा अर्थ त्यांना कळत नसेल, तर त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आम्ही पदयात्रेद्वारे शाळेबाबतचे वास्तव समाजासमोर मांडायला कुटुंबासह घराबाहेर पडलो असताना मुलाबाळांना कुठे सोडणार म्हणून त्यांनाही सोबत घेतले आहे. या मुलांना घरी एकटे कसे ठेवणार. मुले घरी ठेवली तर तुम्ही सांभाळणार का? असा प्रश्नही गावकऱ्यांनी विचारला आहे.
‘शिक्षणाचा अनोखा पॅटर्न सिद्ध केला’
जातेगाव येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स सुरू होताना २००९ साली १६ हजार शेतकऱ्यांनी शेअर्सपोटी पैसे जमा केले. त्या शेतकऱ्यांना शेअर्स कधी देणार ते ढमढेरे व भुजबळ यांनी जाहीर करावे किंवा ज्यांच्या इशाऱ्यावर ते बोलतात त्या आमदार अशोक पवार यांना विचारावे, अशी मागणी वाबळेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. वाबळेवाडी शाळेने शिक्षणाचा अनोखा पॅटर्न सिद्ध केला असून, शासनाने अर्थसंकल्पात आमचा आदर्श राज्याला सांगितल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले. अनेक शिक्षकांना त्रास दिल्याचा सुप्त बदला येत्या २३ तारखेला मतदान यंत्रातून संबंधित घेतील, असेही ग्रामस्थ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.