शिरूर, ता. ११ : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांपैकी एकजण गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पाळत ठेवून त्यालाही अटक केली. त्याने शिरूर, रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर, चाकण व अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली.
शरद बापू पवार (वय २७, रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी, जि. बीड) असे चोरट्याचे नाव आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नाशिक येथे त्याला पकडले. त्याचा साथीदार मारुती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. लिंबोडी, पो. देवी निमगाव, ता. आष्टी, जि. बीड) याला गेल्या चार जूनला शिरूर जवळील सतरा कमानीच्या पुलाजवळ सापळा लावून पकडले होते. त्याने गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त करून तपास केला केला. पवार याच्या मदतीने शिरूर, रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर, चाकण व अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे आठ गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास करून या दोघांनी चोरून नेलेल्या दागिन्यांचा छडा लावला. कडा (ता. आष्टी) येथील एका सोनाराला विकलेले नऊ लाख रुपये किमतीचे सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आले.
दरम्यान, पवार हा गेले महिनाभर पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला फरार घोषित करतानाच पोलिसांनी अत्यंत छुप्या पद्धतीने त्याच्या अधिवासावर लक्ष केंद्रित केले. नाशिक येथील एका नातेवाइकाकडे तो येणार असल्याची माहिती मिळताच सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे व पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड यांनी साध्या वेषात त्या परिसरात पाळत ठेवून गुरुवारी (ता. १०) रात्री त्याला ताब्यात घेतले.