शिरूर, ता. १० : गणेशोत्सवानंतर आलेल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त, बुधवारी रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणपती मंदिरात विशेष पूजाअर्चा आणि मुख्य मूर्तीसह उत्सवमूर्तीचे विधीवत पूजन केले. महागणपतीचा गाभारा सुगंधित व रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता. दुपारच्या महापूजेनंतर ‘मोरया.. मोरया’च्या गजरात महागणपतीला सुवर्णालंकारांसह शाही वस्त्रसाज चढविण्यात आला.
संकष्टी चतुर्थीनिमित्त, पहाटे पाच वाजता महागणपतीला अभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले. यावेळी मुख्य मूर्तीबरोबरच भाद्रपद गणेशोत्सव काळातील उत्सवमूर्ती व इतर देवतांचे विधीवत पूजन केले. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्यावतीने गाभाऱ्यात चमेली, झेंडू, जरबेरा व इतर सुगंधित फुलांची आकर्षक सजावट केली होती. संकष्टी चतुर्थीनिमित्त सकाळी मंदिर प्रांगणात सामुहीक अथर्वशीर्ष पठण सोहळा झाला. यात परिसरातील शेकडो गणेशभक्त सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य दाखविल्यानंतर दर्शन रांगेतील भाविकांच्या हस्ते आरती केली. यावेळी स्वाती पाचुंदकर यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर, देवस्थान चे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, सहव्यवस्थापक पांडुरंग चोरगे, हिशेबनीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके आदी उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.