शिरूर, ता. १४ : वयाची एकसष्टी म्हणजे खरेतर निवृत्तीचा काळ...पण या वयात त्यांनी जिद्दीने कायद्याचे शिक्षण घेतले...त्यांची कायद्याची पदवी अनेकांचे प्रेरणास्थान ठरली...मेहनतीने भरलेल्या या प्रेरक वाटचालीच्या जाहीर सन्मानार्थ स्नेहीजणांचा जणू मेळाच भरला अन् या स्नेहमेळ्यात सन्मान सोहळ्याचे ‘प्रेरणास्थान’ ठरले ॲड. बाबूराव कोंडिबा पाचंगे.
वयाच्या साठीनंतर मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करीत ॲड. बाबूराव पाचंगे यांनी अखंड मेहनतीतून कायद्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. नुकतीच त्यांना वकीलीची सनद मिळाली. हा आनंद जाहीररीत्या साजरा करताना त्यांचे मित्रमंडळी, स्नेही व शिरूर नागरी सन्मान सोहळा समितीच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण खानू मोठे देसाई, शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, आंबेगाव- शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उद्योजक शुभम नवले, शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. उदय सरोदे, प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच बाबाजी वर्पे, शिरूर ग्रुप सोसायटीचे अध्यक्ष अप्पासाहेब वर्पे, युवा किर्तनकार तुषार महाराज पाबळे, भीमछावा संघटनेचे अध्यक्ष चेतन साठे, ढोकसांगवीचे माजी सरपंच गीताराम पाचंगे, केरूभाऊ पाचंगे, सतीश पाचंगे, एकनाथ वाळके आदींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात ॲड. बाबूराव पाचंगे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. परिसरातील शाळांना भेटवस्तूही देण्यात आल्या.
‘‘निवृत्तीनंतर आपली कार्यक्षमता आणि कार्य संपले असे मानणाऱ्या घटकांसमोर बाबूराव पाचंगे हे आदर्श उदाहरण म्हणून उभे राहिले आहेत,’’ अशा शब्दांत प्रकाश धारिवाल यांनी त्यांचा गौरव केला. ते म्हणाले, ‘‘साठीनंतरचे आयुष्य म्हणजे अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलाबाळांना शिक्षण देऊन व्यवसाय- नोकरीत स्थिरस्थावर करणे, त्यांच्या विवाहांचे नियोजन आणि पुढील पिढीच्या अपेक्षांची पूर्तता करणे यातच अनेकांचे जीवन व्यतित होत असते. परंतु, पाचंगे यांनी व्यवसायाची, कुटूंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलताना मेहनत, जिद्द आणि अभ्यासातून पदवी प्राप्त केली. एवढ्यावरच न थांबता कठोर परीश्रम घेत कायद्याची पदवी देखील मिळवली. निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांसमोरील हे आदर्श उदाहरण आहे.’’
युवा नेते सूरज पाचंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मानगावचे नायब तहसीलदार डॉ. अरविंद घेमूड यांनी प्रास्तविकात ॲड. बाबूराव पाचंगे यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतला. पत्रकार रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. चंद्रकांत फरताळे यांनी आभार मानले.
कौटुंबिक स्थिती हलाखीची असल्याने सुरवातीला रोजगार हमी योजनेवर मजुरीची कामे करावी लागली. या मजुरीच्या पैशांतून शिक्षण घेऊन व पुढे आयटीआय करून प्रिटींग प्रेसचा व्यवसाय सुरू केला. त्यातून स्थिरस्थावर झाल्यावर अनेक सामाजिक उपक्रमांतही योगदान दिले. व्यावसायिक वाटचालीतील एका प्रसंगात कायदेशीर अडचण आल्यावर आणि त्यातून अन्यायाची भावना मनात निर्माण झाल्यावर वकील व्हायचे ठरविले. परंतु वकिलीची ही पदवी प्राप्त करताना वयाची साठी उलटली, तरीही जिद्द न सोडता, हिंमत न हारता मेहनतीने अभ्यास चालू ठेवल्याने हे यश प्राप्त करू शकलो.
- ॲड. बाबूराव पाचंगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.