जीवन कड : सकाळ वृत्तसेवा
सासवड, ता. १३ : येथील नगरपालिकेत गेली दोन पंचवार्षिकमध्ये माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील ‘जनमत विकास आघाडी’ची सत्ता होती. मात्र, त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. गतवेळी जनमत विकास आघाडी विरुद्ध आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती, अशी निवडणूक झाली होती. आता भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार), असा थेट संघर्ष होणार की, वेगळे लढणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
यापूर्वी सासवड नगरपरिषदेत भाजपचा एकही सदस्य निवडून आला नव्हता. संजय जगताप यांच्या प्रवेशामुळे आता प्रथमच सासवड नगरपरिषदेवर ‘कमळ’ फुलण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीचा परिणाम सासवडच्या राजकारणावर फारसा होणार नाही. कारण, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या तुलनेत अधिक आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये चंदुकाका जगताप आणि संजय जगताप यांचे वर्चस्व राहिले आहे. आमदार शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सासवड आणि जेजुरी निवडणुकीसाठी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांची व्यूहरचना काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सन २०१७ च्या निवडणुकीत जनमत विकास आघाडीकडे नगराध्यक्षपदासह १९ पैकी १५ नगरसेवक होते, तर शिवसेना-राष्ट्रवादी युतीला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ १५६ मतांनी ‘जनमत’चा नगराध्यक्ष निवडून आला होता. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. ११ प्रभागांमधून एकूण २२ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे, त्यापैकी ११ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी २, इतर मागास वर्गासाठी ६, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी १४ जागा आरक्षित आहेत.
नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांच्या नावाची चर्चा आहे, तर शिवसेनेकडून (शिंदे) माजी नगरसेवक सचिन भोंगळे, राष्ट्रवादीकडून (अजित पवार) माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून तालुकाप्रमुख अभिजित जगताप इच्छुक आहेत. भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याने उमेदवारी ठरवताना नेत्यांचा कस लागणार आहे.
- मागील वेळेचे पक्षीय बलाबल
जनमत विकास आघाडी- १५
शिवसेना-राष्ट्रवादी युती- ०४
- नगरसेवक संख्या आता- २२
- नगरसेवक संख्या मागील- १९
- नगराध्यक्ष आरक्षण- सर्वसाधारण वर्गासाठी खुले
- स्थानिक प्रमुख प्रश्न
१) पाणीपुरवठा आणि स्वच्छता
२) भूमिगत गटार योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
३) कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची अपुरी संख्या
प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) वीर धरणातून नवीन पाणी योजना
२) सार्वजनिक उद्याने बंद
३) अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.