सासवड, ता. ३१ : सासवड (ता. पुरंदर) येथील वाघ डोंगर परिसरात नीलेश हॉलिडेज पुणे, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान आणि एरो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विमान प्रतिकृती प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यावेळी सासवडमधील विद्यार्थ्यांनी विमानांचे टेक- ऑफ, हवेतील चित्तथरारक कसरती आणि लँडिंगचा थरार नुकताच अनुभवला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि विमानविद्येबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ग्लायडर, स्लोस्टिक, राफ्टर, फायटर जेट आणि आर. सी. काईट अशा विविध प्रकारच्या विमानांच्या प्रतिकृतींनी आकाशात झेप घेतली. केवळ उड्डाणेच नव्हे, तर विमानाचे अंतर्गत भाग जसे की सर्वो, ट्रान्समीटर, रिसीव्हर, रडार आणि थ्रोटल कसे काम करतात, याची तांत्रिक माहिती तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिली. सासवड परिसरात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
या एरो मॉडेलिंग शोचा पुरंदर हायस्कूल, गुरुकुल विद्यालय आणि मुथा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, असोसिएशनचे सचिन पाटील, नितीन शहादे, अमित धेंडे, संतोष पिसे, प्रणव चित्ते, कौस्तुभ अरगडे व सदस्य उपस्थित होते.
06223