सासवड, ता. २८ : सहकार महर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त पुरंदर-हवेली तालुक्यासाठी आयोजित भव्य भजन स्पर्धा आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या आकस्मिक निधनामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्व. चंदुकाका जगताप मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
दरवर्षी २९ आणि ३० जानेवारी रोजी स्व. चंदुकाका जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही मतदारसंघातून भजन स्पर्धेची तयारी केली होती. मात्र, राज्याचे लाडके नेतृत्व अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेमुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यंदाचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
अजित पवार यांचे पुरंदर तालुक्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या जाण्याने झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांना श्रद्धांजली वाहणे हे आमचे कर्तव्य आहे, असे स्व. चंदुकाका जगताप मित्र परिवाराच्या वतीने प्रकाश पवार यांनी सांगितले.