सासवड, ता. ३ : सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फोफावलेल्या बेकायदा हुक्का पार्लरमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून, हे प्रकार तातडीने बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल, सचिव कैलास धिवार, अजिम आतार यांनी सासवड पोलिसांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत छुप्या पद्धतीने बेकायदा हुक्का पार्लर सुरू आहेत. या ठिकाणी शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुण जात असून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असून, गोरगरीब पालकांचे संसार उघड्यावर येत आहेत. या हुक्का पार्लरमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. आम्हाला भीक नको, तर राज्यघटनेने दिलेले हक्क हवेत, अशी भूमिका मांडत बहुजन हक्क परिषदेने पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित हुक्का पार्लरवर तातडीने छापे टाकून ते कायमचे बंद करावेत, अशी मागणी केली आहे. जर पोलिसांनी या बेकायदा धंद्यांवर वेळीच लगाम घातला नाही, तर स्थानिक नागरिकांच्या मदतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने दिला आहे.