सासवड, ता. १४ : आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील अमराई परिसरातील तलावाजवळ उपवास सोडण्यासाठी बसलेल्या तरुणांना टोळक्याने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी घडली. शिवीगाळ करत लाठ्या-काठ्या, चाबूक आणि कोयत्याने केलेल्या या हल्ल्यात काही तरुण जखमी झाले असून, याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोंढवा येथील रहिवासी फिरोज जावेद सय्यद (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते आपल्या मित्रांसह आस्करवाडी येथील तलावाजवळ उपवास सोडण्यासाठी बसले होते. यावेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून आलेल्या सुमारे १०० ते १५० अज्ञात व्यक्तींनी कोणतीही चिथावणी नसताना त्यांना घेरले. टोळक्याने जातिवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर भांडणात होऊन जमावाने दांडके, चाबूक व कोयत्याने फिर्यादी व त्यांच्या तीन मित्रांना बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. फिरोज सय्यद यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांच्या नंबरवरून संशयितांचा शोध घेतला जात आहे. चौकशीसाठी काही युवकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मारहाण करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोंढव्यातील ४० ते ५० नागरिकांनी, तसेच काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सासवड पोलिस ठाण्यासमोर रात्री उशिरा जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
पोलिस प्रशासन सखोल तपास करीत आहे. तांत्रिक पुराव्यांच्या साहाय्याने आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू असून, दोषींना सोडले जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जातीय तेढ निर्माण होईल, असे कृत्य करू नये. परिसरात शांतता राखावी.
- कुमार कदम, पोलिस निरीक्षक, सासवड (ता. पुरंदर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.